माणगाव : सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची भीती असून, माणगावमध्येही लागण झाल्याचे वृत्त पसरल्याने खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, सगळीकडे सोशल मीडियावरून अफवांना ऊत आला आहे. याचाच प्रत्यय तालुक्यातही अनुभवास येत आहे. याचा समाजव्यवस्थेवर, बाजारपेठेवर गंभीर दुष्परिणाम होत आहे. अशाच प्रकारचा संदेश व्हायरल झाला असून, एका नामांकित डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचा व्हिडीओ फिरत आहे.माणगावमधील तरुणांनी ही गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती पोलीस हेडकॉन्स्टेबल स्वप्निल कदम यांनी दिली. माणगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी या विषयाची खातरजमा करीत आणखी अफवा पसरविल्या जाऊ नयेत, याची खबरदारी म्हणून माणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने जाहीर आवाहन केले आहे. सध्या सोशल मीडियातून ‘कोरोना व्हायरस’ची लागण माणगावमध्ये झाल्याबाबत नागरिकांमध्ये अफवा पसरवली जात आहे. कोणत्याही प्रकारच्या व्हायरस (विषाणू)ची लागण किंवा प्रसार माणगावमध्ये कोठेही झालेला नसून, नागरिकांनी भयभीत होऊ नये. याची खात्री इंडियन मेडिकल असोसिएशनचे माणगाव शाखा अध्यक्ष डॉ. आबासाहेब पाटणकर यांनी सोशल मीडियावरील व्हिडीओ ही अफवा असल्याचे सांगितले.
‘कोरोना व्हायरस’ची लागण झाल्याची अफवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 00:27 IST