लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आलेले तिन्ही कार्यक्र म कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ते नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.रायगडावर ३ आणि ४ जून रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचा सुवर्ण सिंहासन संकल्प सोहळा, ५ व ६ जून रोजी तारखेप्रमाणे आणि ६ व ७ जून रोजी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या तिन्ही कार्यक्र मांसाठी लाखो शिवभक्त गडावर येणार आहेत. गडावरील पाणीटंचाई, शिवभक्तांच्या हजारो वाहनांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी त्याचप्रमाणे अन्य समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी विविध शासकीय विभाग आणि या कार्यक्र माच्या आयोजक संस्थांचे प्रमुख पदाधिकारी यांची एक संयुक्त बैठक सातपुते यांनी आयोजित केली होती.या तीन कार्यक्र मांमुळे महाड रायगड मार्गावर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी विचारात घेऊन हा एकदिशा मार्ग करता येऊ शकतो का याची चाचपणी करण्याच्या सूचना पोलीस यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. असे झाल्यास महाडकडून रायगडकडे वाहने सोडून त्यांचा परतीचा प्रवास पाचाड निजामपूर मार्गाने होऊ शकतो. गडावरील पाण्याची समस्या विचारात घेऊन प्रत्येक शिवभक्ताने आपल्याबरोबर पुरेसे पाणी बाळगण्याच्या सूचना आयोजक संस्थांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि शिवभक्तांना द्याव्यात असे निर्देशही सातपुते यांनी दिले.या कालावधीत रोपवेचा वापर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिला, लहान मुले अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या शासकीय कार्यक्रमांसाठी जाणाऱ्या शासकीय अधिकारी , कर्मचाऱ्यांनाच करता येणार आहे. गडावर मंडप, विजेची रोषणाई, ध्वनी व्यवस्था, मेघडंबरी वगळता अन्य ठिकाणी फुलांची सजावट करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर सोपविण्यात आली आहे. या सात दिवसांच्या काळात गडावर औषधांसह आरोग्य व्यवस्था आणि गडाच्या पायथ्याशी रु ग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहे .
रायगडावरील कार्यक्र मांसाठी प्रशासन सज्ज
By admin | Updated: May 11, 2017 02:08 IST