लोकमत न्यूज नेटवर्क, दिघी : वाळवटी येथील गर्भवतीची सिझेरियन प्रसूती झाल्यानंतर बाळ, बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याचे समजताच कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही. मात्र, प्रसूतीनंतर काही वेळातच रक्तदाब वाढल्याने आणि अतिरक्तस्राव झाल्यामुळे बाळंतिणीचा मृत्यू झाला अन् अवघ्या क्षणात कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी (ता.३) ही घटना घडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाकडे पुरेसे लक्ष न दिल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
प्रसूतीसाठी गुरुवारी गर्भवती श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. त्याच दिवशी तिची यशस्वी प्रसूतीही झाली. मात्र, त्यानंतर महिलेला त्रास होत असल्यामुळे तिला अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे उपचारासाठी पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला.
रुग्णालयात केवळ प्राथमिक स्वरूपाचेच उपचार उपलब्ध घटनेनंतर स्थानिक रुग्णालयातील सुविधांचा अभाव समोर आला आहे. श्रीवर्धन व म्हसळा, तसेच मंडणगड तालुक्यातील अनेक रुग्ण या रुग्णालयांवर अवलंबून आहेत. मात्र, सध्या येथे केवळ प्राथमिक स्वरूपाचेच उपचार उपलब्ध आहेत. जटिल प्रसंगांमध्ये रुग्णांना तत्काळ मुंबई, तसेच जिल्हा रुग्णालयात हलवावे लागते; परंतु वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने अनेकवेळा अशा दुर्दैवी घटना घडतात.
रुग्णालयात सुविधांचा अभाव, महत्त्वाची पदे रिक्तरुग्णालयात सध्या स्त्रीरोगतज्ज्ञ पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे गर्भवतींना योग्य व वेळेवर तज्ज्ञ सेवा मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. वैद्यकीय अधीक्षक पदही रिक्त असून, रुग्णालयाचे प्रशासकीय कामकाज तात्पुरत्या जबाबदारीवर सुरू आहे. आरोग्य विभागाने या पदांवर तातडीने नेमणुका करून रुग्णालयातील सेवांचा दर्जा सुधारावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
रुग्णाला अतिरक्तस्राव झाल्याने पुढील उपचारसाठी आयसीयू सुविधा मिळावी, यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. डॉ. प्रफुल्ल पावसेकर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक.