अलिबाग : गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने आमटेम, गडब, नागोठणे आदि गावांच्या हद्दीतून जेएसडब्ल्यू व डोलवी कंपनीकरिता तसेच ४५ गावांच्या मोफत पिण्याच्या पाण्याकरिता दोन जलवाहिन्या गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात होत्या. मात्र गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामानिमित्ताने या दोन्ही जलवाहिन्या स्थलांतरित करणे अनिवार्य होते. या जलवाहिनी स्थलांतरास आमटेम, गडब, नागोठणे आदि ग्रामस्थांनी विरोध केल्याने अखेर गुरुवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात या जलवाहिनीच्या स्थलांतराचे काम सुरूकरण्यात आले.जलवाहिनीचे स्थलांतर करण्याकरिता शासकीय नियमाप्रमाणे भूमी संपादन करण्याचे आदेश दिले होते. त्यास स्थानिक ग्रामस्थांचा विरोध होता. या पार्श्वभूमीवर पेण तहसीलदार, पेण प्रांताधिकारी आणि रायगड जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर गेल्या दोन वर्षांपासून बैठका घेवून वस्तुस्थिती आणि जलवाहिनी स्थलांतराची निकड ग्रामस्थांना सांगण्यात आली होती, अशी माहिती जेएसडब्ल्यूचे वरिष्ठ व्यवस्थापक अरुण शिर्के यांनी दिली.जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनीबरोबरच कंपनीने दुसरी जलवाहिनी स्वखर्चाने टाकून पेण तालुक्यातील एकूण ४५ गावांना पिण्याचे पाणी गेल्या ८ ते १० वर्षांपासून मोफत देण्यात येत आहे. गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पावसाळा संपल्यावर वेगाने सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या जलवाहिन्या सुयोग्य प्रकारे तत्काळ स्थलांतरित करुन घ्याव्यात, अन्यथा रुंदीकरणाच्या कामात त्या तुटल्या तर त्यांची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची नाही असे महामार्ग प्राधिकरणाने कंपनीस कळविल्याने या जलवाहिन्या तातडीने स्थलांतरित करणे अनिवार्य झाले होते. रुंदीकरणाच्या कामात या जलवाहिन्या तुटल्या असत्या तर कंपनीबरोबरच ४५ गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला असता, या पार्श्वभूमीवर पुन्हा संबंधित गावच्या ग्रामस्थांना विनंती करण्यात आली होती. काहींचा विरोध होता. अखेर अनुचित प्रकार घडू नये याकरिता जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये पोलीस बंदोबस्तात हे जलवाहिनी स्थलांतराचे काम सुरु करण्यात आले असल्याची माहिती शिर्के यांनी देवून ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. (विशेष प्रतिनिधी)
पोलीस बंदोबस्तात जलवाहिनीचे काम
By admin | Updated: October 22, 2016 03:34 IST