पनवेल : पनवेल स्टेशनपासून जवळच असलेल्या विचुंबे गावामधील अतिक्रमणांवर कारवाईसाठी गेलेल्या पथकाला स्थानिकांच्या विरोधामुळे माघारी परतावे लागले. स्थानिकांनी पुलाच्या दोन्ही बाजुला डंपर उभे करून रास्तारोको केला. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पथक माघारी फिरले.
नैना परिसरातील अनधिकृत बांधकामांवर सिडको नैना कडून कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी विचुंबे गावातील अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्याकरीता नैना अतिक्रमण विभाग फौज फाटा घेऊन दाखल झाला होता. काही दिवसांपूर्वी त्यांना नोटीसाही देण्यात आल्या होत्या.
विचुंबे गावातील ओमकार डेव्हलपर्सने तीन मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम केले आहे. नैनाकडून कोणतीही परवानगी घेतली नाही. वारंवार नोटीस देवून सुध्दा बांधकाम चालू ठेवले असल्याने अतिक्रमण विभाग करवाईसाठी आला होता. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गाळ्यांनाही नोटीस देण्यात आली होती.
पोलिसांकडून मध्यस्थी नैना अतिक्रमण विभागाचे नियंत्रक अमित शिंदे आणि गावकऱ्यांसोबत पोलिसांकडून मध्यस्थी चर्चा करण्यात येत आहे. लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र गिड्डे यांनी सांगितले.