- जयंत धुळप, अलिबाग
५ जून या जागतिक पर्यावरण दिनी यंदा रविवार आला असल्याने शासकीय स्तरावरील या दिनानिमित्त आयोजित उपक्रमांमध्ये मोठा अडसर निर्माण झाला आहे. दरम्यान, शासनाच्या हक्काच्या असणाऱ्या शाळांनादेखील मे महिन्याची सुटी असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांमध्येदेखील जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन करता येत नसल्याची मोठी समस्या समोर आली आहे. दरम्यान, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक व्ही.जी. जुकर यांनी पेण, म्हसळा आणि पाली येथील ग्रामपंचायती व काही शासकीय कर्मचारी यांच्या सहयोगाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रातिनिधिक वृक्षारोपणाचे आयोजन केले आहे. श्रीवर्धन तालुक्यात सा.बां.वि. व लागवड अधिकारी म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण कार्यक्रम सा.बां. विभागाच्या कार्यालयात संपन्न होणार आहे. त्यामध्ये ७५ रोपे लागवड करण्यात येणार असून, म्हसळा तालुक्यातील तहसीलदार म्हसळा यांचे निवासस्थान व रेस्ट हाऊस परिसरात वृक्ष लागवड कार्यक्र म करण्यात येणार आहे. तसेच १५ जून २०१६ रोजी २३ शाळांमध्ये वृक्षारोपण व वृक्षदिंडी व वृक्ष लागवडीबाबतचे प्रबोधन करण्याचा कार्यक्र म नियोजित केला आहे.माणगाव तालुक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मध्यवर्ती रोपवाटिका पहेल येथे वृक्षारोपण कार्यक्रम, सरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे. तसेच १५ जूनला शाळांमार्फत प्रबोधन करून २० रोपे लागवड करण्यात येणार आहेत.वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती : अलिबाग तालुक्यात ग्रापंचायत थळ येथे सरपंच व सदस्य यांच्या हस्ते २५ रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. महाड तालुक्यात महाड उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात १० रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार असून, हरित सेना अंतर्गत महाड व पोलादपूर तालुक्यातील २० शाळांमध्ये वृक्षारोपण व त्याबाबतचे महत्त्व पटवून देणारे प्रबोधन करण्यात येणार आहे.