अलिबाग : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रायगड जिल्ह्यातील तब्बल एक लाख ४१ हजार १०९ कुटुंबांना होणार आहे. ही योजना आता केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राबविण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना आवश्यक असणारी ई-गोल्ड कार्ड आता ई-सेवा केंद्र आणि संबंधित रुग्णालयात मिळणार आहेत.नॅशनल इन्श्युरन्स कंपनीच्या सहभागाने ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत दारिद्र्य रेषेखालील पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबे, दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंब तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना विमा संरक्षणाद्वारे वैद्यकीय सेवा पुरवली जाते. या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब दीड लाख रुपये इतक्या विमा संरक्षण रकमेच्या मर्यादेपर्यंत मोफत उपचार केले जातात. तर मूत्रपिंड प्रत्यारोपण सारख्या शस्त्रक्रियेसाठी अडीच लाख रुपये इतकी मर्यादा आहे. ३० विशेष सेवा, ९७१ गंभीर आजार व १२१ प्रकारचे खर्चिक उपचार व शस्त्रक्रिया पश्चात सेवांचाही यात लाभ आहे. राज्यात ४८४ अंगीकृत सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधून रुग्णांना रोख रक्कमरहित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येते. योजनेत राज्यातील ८३ लाख ७२ हजार कुटुंबांचा समावेश आहे. त्यात खर्चमर्यादा वाढविण्यात आली आहे. लाभार्थी कुटुंबांना प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया मोफत करता येणार आहे. या योजनेत केंद्राचा ६० टक्के तर राज्याचा ४० टक्के हिस्सा आहे.>लाभार्थ्यांसाठी ई-गोल्ड कार्डया सर्व व्यक्तींना ई-गोल्ड कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. हे कार्ड लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट रुग्णालये, आपले सरकार सेवा केंद्र अशा ५७० ठिकाणी उपलब्ध आहेत. लाभार्थ्यांनी हे कार्ड घेण्यासाठी स्वत:चा फोटो, रेशन कार्ड, ओळखपत्र व पंतप्रधानांच्या स्वाक्षरीचे कुटुंबाला प्राप्त झालेले पत्र सोबत न्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७३६४ कार्ड वाटप झाले आहेत; परंतु लाभार्थ्यांची संख्या पाहता लवकरात लवकर कार्ड वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर मेळावे आयोजित करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. तसेच सर्व कार्ड वितरण करणाऱ्या यंत्रणांनाही कार्ड लाभार्थ्यांना देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.>रायगड जिल्ह्यातील स्थितीरायगड जिल्ह्यात २० हजार ६२० शहरी भागातील, तर एक लाख २० हजार ४८९ ग्रामीण भागातील कुटुंब या योजनेसाठी पात्र आहेत. अशाप्रकारे रायगड जिल्ह्यातील पाच लाख सहा हजार ७७ व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. आतापर्यंत जिल्ह्यात ७३६४ कार्ड वाटप करण्यात आले आहेत.
जनआरोग्य योजनेचा लाखो कुटुंबांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:43 IST