मधुकर ठाकूर, लाेकमत न्यूज नेटवर्क, उरण: गोरगरिबांच्या कवडीमोल भावाने संपादन केलेल्या जमिनी बड्या भांडवलदारांना विकून कोट्यवधींचा नफा कमविणाऱ्या सिडकोची वक्रदृष्टी आता जागतिक कीर्तीच्या एलिफंटा बेटावर वळली आहे. एलिफंटा व न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग आणि आर्थिक मॉडेलिंगसाठी सल्लागार सेवा नियुक्ती करण्याचे नियाेजन असून, यासाठी सिडकोने निविदा मागविल्या आहेत. यामुळे स्थानिक ग्रामस्थ व परिसरातील व्यावसायिक संभ्रमात पडले आहेत.
एलिफंटा बेटाला जागतिक वारसा लाभलेला आहे. बेटाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकासासाठी पुरातत्व विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, आयटीडीसी, बंदर विभाग, एनजीओ, स्थानिक ग्रामपंचायत आणि इतर विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे थोड्या फार प्रमाणात एलिफंटा बेटाचा विकास आणि पर्यटकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, गैरसोयी दूर करण्यात यश आले आहे.
जमिनी भांडवलदारांच्या घशात घातल्याचा आराेप
सिडकोने याआधीच नवी मुंबई परिसरात दुसऱ्या मुंबईची निर्मिती केली आहे. यासाठी सिडकोने स्थानिक शेतकरी, प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी कवडीमोल भावाने संपादन केल्या. त्यांना वारेमाप आश्वासने दिली होती. कवडीमोल भावाने संपादन केलेल्या जमिनी बड्या भांडवलदारांच्या घशात घालून कोट्यवधींचा नफा सिडकाेने कमावल्याचा आराेप ग्रामस्थ करत आहेत.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या सल्लागार सेवा देणाऱ्या अनुभवी कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर पर्यटन क्षेत्राचा विकास मॉडेल व आर्थिक मॉडेलिंगसाठी सल्लागार सेवा नियुक्ती करणार आहे. सल्लागार एजन्सीच्या अहवालानुसारच एलिफंटा व न्हावा बेटावर विकास कामांची दिशा ठरवली जाईल.- प्रियदर्शन वाघमारे, अधिकारी, सिडकाे, नियाेजन विभाग