शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, फक्त..." अरविंद केजरीवालांचे मोठे विधान
4
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
6
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
7
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
8
मुंबई मनपानं नोटीस बजावली, तरीही २९ महाकाय होर्डिंग जसेच्या तसे!
9
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
10
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
11
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
12
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
13
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
14
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
15
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
16
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
17
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
18
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
19
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
20
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय

चला, अलिबागच्या प्रसिद्ध ‘पोपटी पार्टी’ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 9:16 AM

डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या तीन महिन्यांत मात्र एक वेगळंच आकर्षण अनेकांना अलिबागकडे खेचून आणतं, ते म्हणजे अलिबागची सुप्रसिद्ध पोपटी! 

- तुषार श्रोत्री, खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक

रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेलं अलिबाग हे तीन बाजूंनी सागरकिनारा लाभलेलं एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून देशभरातल्या पर्यटकांना आकर्षित करतं. अथांग समुद्र, नारळीच्या बागा, काही तुरळक डोंगर, टेकड्या यांनी नटलेलं आणि मुंबईच्या इतकं जवळ असूनही अजून वाडी संस्कृती टिकवून राहिलेलं हे गाव वर्षभर आठवड्याचे सातही दिवस पर्यटकांनी बहरलेलं असतं. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या तीन महिन्यांत मात्र एक वेगळंच आकर्षण अनेकांना अलिबागकडे खेचून आणतं, ते म्हणजे अलिबागची सुप्रसिद्ध पोपटी! 

वालाच्या, तुरीच्या शेंगांसोबत बटाटे, रताळी, आरवीचे कंद, वांगी, टोमॅटो, कांदे, पनीरचे तुकडे, मक्याच्या कणसाचे तुकडे, सिमला मिरचीचे तुकडे, इत्यादी आपल्याला आवडणारे आणि भाजून खायला स्वादिष्ट लागतील असे सर्व प्रकारचे खाद्य जिन्नस या पोपटीसाठी वापरले जातात. गुजराती लोकांचा जसा या मोसमात उंदियो सर्वत्र बनवला आणि हादडला जातो, अगदी तसाच आपल्या रायगडवासीयांचा हा पोपटी. उंदियोमध्ये तेलाचा सढळ हस्ते वापर केला असतो, तर पोपटीमध्ये अभावानेच तेल आढळते, त्यामुळे शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीनेही पोपटी चांगलीच.

थंडीच्या दिवसांत या भागात शेताच्या कडेने उगवणारा भांबुर्डी नावाचा जंगली झुडुपांचा पाला मातीच्या मडक्यात तळाला आणि आतल्या बाजूने लावून त्यात आपल्याला हवे ते जिन्नस मॅरीनेट करून किंवा थोडाफार मसाला लावून, त्यावर चवीसाठी शक्यतो खडे मीठ पेरून त्या मडक्यात ठासून भरले जातात. मडक्यात हवा शिरली तर आतले जिन्नस जळून पोपटी फसत असल्याने हे ठासून भरणं फार महत्त्वाचं असतं. सर्व जिन्नस भरून झाल्यावरही मडक्यात जागा उरली तर त्यात भांबुर्ड्याचा पाला घट्ट दाबून भरावा लागतो. त्यामुळे आपल्या खाण्याच्या क्षमतेनुसारच वापरण्यात येणाऱ्या मडक्याचा आकार ठरवावा. शेतात खड्डा करून त्यात हे पोपटीचं मडकं सर्व बाजूंनी समान जाळ लागेल अशा प्रकारे वाळक्या फांद्या, गवत, पालापाचोळा यांनी वेढून चांगलं अर्धा ते पाऊण तास भाजलं जातं. भाजी किंवा आमटी झाली आहे. आता गॅस बंद करायला हरकत नाही हे जसं घरातल्या बाईला न शिकवताही कळतं, तसंच मडकं जाळाच्या बाहेर काढण्यायोग्य झालं आहे हे तिथल्या जाणकार दर्दी तज्ज्ञ लोकांना पटकन कळतं.

आता खरा पोपटीतल्या कौशल्याचा भाग सुरू होतो तो म्हणजे त्या मडक्यातून आतले जिन्नस अजिबात जळू न देता बाहेर काढणे. यासाठी साधारणतः चिंचा, बोरं काढायला वापरतात तशी पुढे आकडा असलेली लोखंडी शीग वापरतात. आधीच पसरून ठेवलेल्या केळीच्या पानांवर हे मडकं आडवं ठेवलं जातं आणि त्या आकड्याच्या साहाय्याने आतले सर्व जिन्नस एक-दोन झटक्यांत बाहेर काढले जातात. ते जिन्नस आत असताना मडक्यात हवा शिरली तर ते जिन्नस क्षणार्धात जळतात आणि कडू लागतात. ते बाहेर काढताच त्यातील खाद्य पदार्थ भांबुर्ड्याच्या पाल्यापासून वेगळे काढले जातात. माझा अनुभव असा आहे की, बहुतेक वेळा या विलगीकरणाच्या प्रक्रियेदरम्यानच पोपटी चाखायला किंबहुना खायला सुरुवात होते. कारण त्या सर्व मस्त भाजलेल्या पदार्थांमध्ये भांबुर्ड्याचा उतरलेला स्वाद इतका अप्रतिम असतो की, त्यासाठी आणखी काही वेळ थांबणं माझ्यासारख्या खवय्यांसाठी निव्वळ अशक्य असतं. मला खात्री आहे वाचतानाही तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. मंडळी, आमच्या रायगडची पोपटी ही संपूर्ण प्रक्रियाच वाचायची कमी व अनुभवायची आणि मग यथेच्छ हादडायची गोष्ट आहे!