लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : वंचित समाजातील मुलांना शिक्षणासाठी व जगण्यासाठी बहुतांशी परिस्थिती प्रतिकूल असते. या परिस्थितीवर मात करत ही मुले औपचारिक शिक्षणच नाही तर जीवन जगण्यासाठी शिक्षण घेतात. आनंदी जीवन जगण्यासाठी प्रेम, स्वास्थ्य व जिव्हाळ्याबरोबरच मूलभूत हक्कही महत्त्वाची भूमिका बजावतो. जीवनाच्या संघर्षाला सक्षमपणे तोंड देण्यासाठी व नेतृत्व गुण विकास करण्यासाठी उन्हाळी शिबिर आयुष्यात महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी केले आहे.पेण तालुक्यातील सावरसई येथे अंकुर ट्रस्ट व चाईल्ड हेवन या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदिवासी व निराश्रित मुला-मुलींच्या नेतृत्व गुण विकास शिबिराच्या समारोपप्रसंगी पाटील बोलत होत्या. यावेळी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभिनयाच्या राज्य प्रमुख डॉ. अस्मिता पाटील, कामगार चळवळीतील कार्यकर्त्या अॅड. चित्रा भानुदास, नितीन पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.आठ दिवस मोफत निवासी शिबिरात चाईल्ड हेवन संस्थेतील ६२ कुमारवयीन मुले-मुली सहभागी झाल्या होत्या. शिबिरात राष्ट्र सेवा दलाचे यशवंत भिडे, देविदास पाटील यांच्याबरोबरच सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी मुलांशी संवाद साधून बौद्धिक घेतले. मुंबईच्या प्रेरणा या संस्थेचे कार्यकर्ते पंकज गुरव व आभा धुळप यांनी खेळ, नाटक व गाण्यांद्वारे मुलांना सामाजिक प्रश्नांची जाण करून दिली. निसर्ग हास्य क्लबद्वारे दररोज योग व प्राणायाम शिकविण्यात आले. आपले मनोगत मांडताना चाईल्ड हेवन संस्थेतील योगेश हिवाळे या मुलाने मुलांमध्ये गटचर्चा घडवून आणून आपल्या नेतृत्व गुणाची आगळी झलक समारोप समारंभात उपस्थितांना दाखवून दिली, तर मुलांनी समूहगान सादर केले. शिबिराचे व्यवस्थापन प्रकाश पाटील यांनी तर सूत्रसंचालन जितेश शिरसाट यांनी केले. संजय नाईक यांनी आभार प्रदर्शन केले.
जीवनातील संघर्षासाठी नेतृत्व विकास आवश्यक
By admin | Updated: May 9, 2017 01:28 IST