पेण : पेणमधील हमरापूर विभागातील जोहे - कळवे, तांबडशेत, दादर, सोनखार उर्णोलीसह वरेडी या गावांना गेले १० दिवस ठप्प असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ठोस आश्वासन सिडको पाणीपुरवठा मुख्य अभियंता चौधरी यांनी दिल्याने कलाग्राम नगरीत गणेशमूर्ती निर्माण व्यवसाय व पिण्याचे पाणी अशा दोन्ही बाबींना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सायंकाळी ३.३० वाजता बेलापूर - कोकण भवन येथे झालेल्या बैठकीत शेकाप आ. धैर्यशील पाटील यांच्यासह सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाची बैठक सकारात्मक होऊन उच्च दाबाने सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे सिडको मुख्य अभियंता चौधरी यांनी ठोस आश्वासन दिल्याने कलाग्राम नगरीतील पाणीटंचाईचे विघ्न दूर झाले आहे.सिडकोने पेणच्या जिते वॉटर फिल्टरेशन प्लँटवर मोठे ताकदीचे पाणी खेचणारे वॉटर पंप बसविल्याने सिडकोच्या मुख्य लाइनवरून कनेक्शन घेतलेल्या जोड कनेक्शनना पाणी मिळत नव्हते. याचा परिणाम हमरापूर विभागातील कलाग्राम नगरीला बसला. सुरुवातीस याबाबत सिडको पाणीपुरवठा विभागाने नळपाइप दुरुस्तीचे काम काढले असावे, असा स्थानिक लोकांचा समज झाला. आज पाणी नाही आले तर उद्या येणार, या आशेने आठवडा उलटला. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य समजताच या परिसरातील जोहे, कळवे, दादर, सोनखार, वरेडी ग्रामपंचायत सरपंच व मान्यवर मंडळींनी घातली. सिडको अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर याबाबत आमदारांनी सिडको अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा केली होती. त्यानंतर शुक्रवारी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन सिडको मुख्य अभियंता चौधरी, उप अभियंता गोसावी, आ. धैर्यशील पाटील व स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच व मान्यवरांच्या शिष्टमंडळासोबत ही बैठक पार पडली. पाणीप्रश्न लागला मार्गी गेल्या १० दिवसांपासूनचा ठप्प झालेला पाणीपुरवठा व त्याबाबत स्थानिकांमध्ये असंतोषाचा उद्रेक होऊ नये यासाठी बैठक पार पडली. तांबडशेत, जोहे, कळवे, दादर, सोमखार, उर्णोली व वरेडी या सात गावांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर सिडकोच्या आश्वासनाने कलाग्राम नगरीचा पाणीप्रश्न मार्गी लागला.या बैठकीसाठी आ. पाटील यांच्यासह ४० ते ४५ आजी - माजी सरपंच मंडळी उपस्थित होती.
जोहे, कळवे पाणीपुरवठा होणार सुरळीत
By admin | Updated: May 29, 2016 03:02 IST