नेरळ : कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील टेंभरे गावात रेशन दुकानदाराकडून गोरगरीब जनतेची पिळवणूक करण्यात येत आहे. धान्य कमी दिल्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलांना शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, येथील दुकानचालक एक महिला असूनही महिलांना योग्य वागणूक दिली जात नसल्याने रेशन दुकानदारावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी एका विनंती अर्जाद्वारे केली आहे.एकीकडे अन्न नागरी पुरवठामंत्री रेशन दुकानदारांनी गैरकारभार केल्यास तथा लाभार्थ्यांना स्वस्त धान्य देताना कुचराई केल्यास कडक कारवाईचा इशारा देत आहेत, तर दुसरीकडे कर्जत तालुक्यातील काही रेशन दुकानदार गोरगरिबांची पिळवणूक करीत आहेत. याचसंदर्भात अनेक तक्रारी तहसीलदार कार्यालयात करण्यात येत आहेत. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून, प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ तसेच नियमित दरमहा मिळणारे धान्य रेशन दुकानदारांच्या माध्यमातून वितरित करण्यात येत आहे. मात्र, कर्जत तालुक्यातील काही दुकानदार आपत्तीकाळातही धान्यवाटपात गैरव्यवहार करून गरीब गरजूंना लाभापासून वंचित ठेवत असल्याचे समोर येत आहे.कर्जत तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या टेंभरे गावातील महिला हिराबाई अशोक जाधव व कुंदा रमेश जाधव धान्य आणण्यासाठी एक बचतगटाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या रेशनिंग दुकानात गेल्या होत्या. या वेळी महिला दुकानदाराने शिवीगाळ करीत दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. तसेच गावासमोर तक्रारदार महिलेस अपमानित केले. दुकानधारकाकडून नेहमीच धान्यवाटपात अनियमितता केली जाते, लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची पावती दिली जात नाही. प्रतिकुटुंब मिळणारे धान्यही कमी दिले जात असल्याचे ग्रामस्थांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.दुकानदाराकडून कधीही पूर्ण धान्य दिले जात नाही, याबाबत जाब विचारल्यास शिवीगाळ, मारहाण केली जाते. असाच प्रकार काही महिन्यांपूर्वीटेंभरे आदिवासीवाडीतील काशीनाथ वाघमारे व अनंता मुरकुटे यांच्याबाबतीत घडला होता.कधीही पूर्ण धान्य मिळत नाहीटेंभरे गावातील रेशनिंग दुकानदार मनमानी करत असून कधीच धान्य पूर्ण देत नाही, त्याची पावतीही देत नाही. याबाबत सर्व ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयात तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप कारवाई करण्यात आली नाही. धान्य कमी दिल्याबाबत विचारणा केल्यास शिवीगाळ करून अपमानित करण्यात येते. या प्रकरणी सर्व ग्रामस्थांनी तहसीलकडे तक्रार अर्ज केला असल्याचे ग्रामस्थ अशोक बाबू जाधव याने सांगितले.बचतगटातर्फे चालवण्यात येणारे रेशन दुकान महिला बचतगटाच्या नावे असले तरी दुकान गटातीलच मंदा विनायक भोईर व त्यांचा मुलगा चालवत आहे. गटातील इतर महिलांना सदस्यांना कधीही विचारात घेतले जात नाही. कोणत्याही प्रकारचा आर्थिक हिशोब दिला जात नाही. ते आपलीच मनमानी करतात.- नीरा तानाजी देशमुख, बचतगट सदस्या, टेंभरेटेंभरे येथील रेशन दुकानासंदर्भात तक्रारी आल्या आहेत. याची चौकशी करून दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल.- विक्रम देशमुख, तहसीलदार, कर्जत
कर्जतमध्ये रेशन दुकानदाराकडून ग्रामस्थांना अपमानास्पद वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 06:37 IST