अमोल पाटील, खालापूररस्ता, पाणी, शाळा अशा मूलभूत सुविधांसाठी आदिवासींना झगडावे लागत असल्याचे चित्र खालापूर तालुक्यातील नंदनपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या गारमाळ येथे पहायला मिळत आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असतानाही विकासाचा सूर्य मात्र या ठिकाणी उगवलाच नसल्याने येथील रहिवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून मुख्य प्रवाहापासून येथील रहिवासी आजही बाहेर आहेत. त्यामुळे सरकार आमच्याकडे कधी लक्ष देणार, असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.मुंबईपासून जवळ असलेल्या या तालुक्यातील दुर्गम भागातील प्रश्न मात्र आजही कायम आहेत. खोपोली-पेण रस्त्यावर वावोशीपासून गारमाळ हे गाव ७ कि.मी. आत डोंगरात वसले आहे. आदिवासी व धनगर समाजाची ५०० ते ७०० लोकवस्ती या ठिकाणी आहे. गावात विजेची सोय वगळता अन्य कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. गावापासून दीड कि.मी. अंतरावर असलेल्या विहिरीतून पिण्याचे पाणी आणावे लागते. साधारण २५ वर्षांपूर्वी या विहिरीची निर्मिती करण्यात आली असून सध्या ही विहीर शेवटची घटका मोजत आहे.गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थ व विद्यार्थी पायवाटेचा वापर करतात. सात किमीचे अंतर पार करून विद्यार्थ्यांना वावोशी येथील छत्रपती विद्यालयात यावे लागते. रस्ता नसल्याने रुग्ण, गर्भवती महिला यांचे खूप हाल होतात. अनेकदा यामुळे रुग्णांना प्राणही गमवावे लागले आहेत. कामासाठी बाहेर येणाऱ्या कामगारांनाही त्रास सहन करावा लागतो. गारमाळकडे जाणारा रस्ता वनविभागाच्या हद्दीतून गेल्याने रस्ता करायला अडचण येत असल्याचे ग्रामसेवक बी. बी. जाधव यांनी सांगितले. गारमाळमधील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विहिरीची दुरूस्ती करून स्वच्छता करणार आहोत. रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निधीची तरतूद केली असून पावसाळा संपल्यानंतर नंदनपाडा ते गारमाळ रस्त्याचे काम सुरू केले जाणार आहे. - श्यामसुंदर साळवी, उपसभापती, पंचायत समिती, खालापूर
गारमाळ अद्यापही विकासापासून वंचित
By admin | Updated: September 3, 2015 23:30 IST