आक्षी शिलालेखाचे जतन करण्यासाठी तीन लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 12:36 AM2021-04-04T00:36:03+5:302021-04-04T00:36:15+5:30

जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तरतूद

Fund of Rs. 3 lakhs for preservation of Akshi Inscription | आक्षी शिलालेखाचे जतन करण्यासाठी तीन लाखांचा निधी

आक्षी शिलालेखाचे जतन करण्यासाठी तीन लाखांचा निधी

googlenewsNext

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील आक्षी येथील शिलालेख हा मराठीतील आद्य शिलालेख म्हणून ओळखला जातो. सध्या हा शिलालेख रस्त्याकडेला दुर्लक्षित अवस्थेत उभा आहे. या शिलालेखाचे जतन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, यासाठी जिल्हा परिषदेने ३ लाखांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मराठी भाषा दिनी शिलालेखाची पाहणी करीत शिलालेखाचे जतन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचा शब्द दिला होता. याबाबत अर्थ व बांधकाम सभापती नीलिमा पाटील यांनी सकारात्मक पाऊल उचलत नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात शिलालेखाचे जतन करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. कर्नाटक राज्यातील श्रवण बेळगाेळ येथील बाहुबली गोमटेश्वरांच्या मूर्तीखाली लिहिलेला शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख मानला जातो. हा शिलालेख इस १११६-१७ च्या दरम्यान कोरला गेला असल्याचे दाखले मिळतात. गंग राजघराण्यातील चामुण्डाराय या मंत्र्याने या गोमटेश्वराची मूर्ती तत्कालीन राणीच्या आग्रहास्तव बनवून घेतली. या मूर्तीखाली एक शिलालेख कोरण्यात आला. त्यात कन्नड, तमिळ आणि मराठी भाषा कोरली गेली. ‘श्री चामुण्डाराये करवियले, गंगाराये सुत्ताले करवियले’ अशी वाक्ये या शिलालेखावर आढळतात. मात्र, रायगड जिल्ह्यातील आक्षी येथे याहूनही जुना एक शिलालेख आढळून आला आहे. मात्र पुरातत्त्व विभागाच्या अनास्थेमुळे हा शिलालेख दुर्लक्षित अवस्थेत पडून आहे. ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. श. गो. तुळपुळे यांच्या संशोधनानुसार हा मराठीतील पहिला शिलालेख असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिलालेखाची निर्मिती शके ९३४ म्हणजे इस १०१२ झाल्याचा स्पष्ट उल्लेख या शिलालेखावर आहे.

 शिलालेखाचे जतन करण्याची मागणी आक्षी ग्रामपंचायत, इतिहासप्रेमी तसेच नागरिकांमधून सातत्याने करण्यात येत होती. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यापूर्वीच पुरातत्व विभागातील अधिकारी राजेंद्र यादव यांच्यासोबत संपर्क साधला असून, शिलालेखाचे जतन‌ करण्याची मागणी करीत आवश्यक उपाययोजना यावर चर्चा ‌केली आहे. राजेंद्र यादव यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत शिलालेखाचे जतन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.

शिलालेखावरील मजकूर
आक्षी येथे खोदकाम करताना सापडलेल्या या शिलालेखावर देवनागरी लिपीत नऊ ओळी कोरण्यात आल्या आहेत. या लिपीवर संस्कृत भाषेचा प्रभाव आहे. 
पश्चिम समुद्रपती श्री कोकण चक्रवर्ती केसीदेवराय यांच्या महाप्रधान भरजू सेणुई याने हा शिलालेख कोरून घेतला असून, महालक्ष्मीदेवीच्या बोडणासाठी दर शुक्रवारी नऊ कुवली धान्य देण्याचा उल्लेख इथे करण्यात आला आहे. शके ९३४ मधील प्रभव संवत्सर अधिक कृष्णपक्षातील शुक्रवारी हा निर्णय घेतल्याचा उल्लेख इथे आहे. तसेच शिलालेखाचे विद्रुपीकरण करणाऱ्याला शापही देण्यात आला आहे.

Web Title: Fund of Rs. 3 lakhs for preservation of Akshi Inscription

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.