अलिबाग : महाराष्ट्रात अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. महिला सुरक्षित नसल्याने सरकारने त्यांना संरक्षण दिले पाहिजे. अलिबाग तालुक्यात अशाच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. या अमानुष घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपीला कडक शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी अलिबाग तालुका आदिवासी कातकरी समाज संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. आंदोलकांनी यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.अलिबाग तालुक्यातील श्रीगाण आदिवासी वाडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला होता. पोलिसांनी चोवीस तासांच्या आत आरोपीला गजाआड केले होते. या घटनेचा निषेध आंदोलकांनी शुक्रवारी मोर्चा काढून व्यक्त केला. कोळसाभट्टी, वीटभट्टी या ठिकाणी मुली आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असतात. त्या घटनेची नोंद सरकार घेत नाही. शाळेत जाणाऱ्या मुली, रोजगारासाठी बाहेर जाणाऱ्या महिलांना सरकारने संरक्षण दिले पाहिजे अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.याप्रसंगी संघटनेचे दत्ता नाईक, मुकेश नाईक, रेखा वाघमारे, गुलाब नाईक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अलिबागमध्ये महिलांच्या संरक्षणासाठी मोर्चा
By admin | Updated: October 22, 2016 03:33 IST