- राजेश भोस्तेकर लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : राज्यातील मत्स्य उत्पादनात २०२४-२५ मध्ये तब्बल २९ हजार १८४ मेट्रिक टन वाढ नोंदविण्यात आली असून त्यात रायगड जिल्ह्याचा वाटा १ हजार ६६८ मेट्रिक टन एवढा आहे. २०२४-२५ मध्ये ४ लाख ६३ हजार ७५८ मेट्रिक टन तर त्याआधी २०२३-२४ मध्ये ४ लाख ३४ हजार ५७४ मे टन मत्स्य उत्पादनाची नोंद झाली होती. या उत्पादनात ठाण्याने सर्वाधिक २८ हजार टन आणि पालघरने दीड हजार टन मत्स्य उत्पादन वाढीची नोंद केली.
हवामानातील बदल, परराज्यातील मासेमारी बोटींची राज्याच्या सागरी हद्दीत होणारी घुसखोरी, वाढते प्रदूषण, अनियंत्रित मासेमारी त्यामुळे मत्स्य उत्पादनात सहा वर्षांपासून घट होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने परप्रांतीय मासेमारी बोटींची घुसखोरीबरोबरच पर्ससीन व एलईडी मासेमारी रोखण्यातही यश मिळविले आहे. अवैध मासेमारीवर आता ड्रोनने लक्ष ठेवले जात आहे, त्याचा परिणाम अवैध मासेमारी कमी होण्यावर झाला आहे, असा दावा राज्याच्या मत्स विभागाकडून करण्यात येत आहे.
२०२३-२४ मध्ये राज्यात ४ लाख ३४ हजार ५७४ मे टन, तर २०२४-२५ मध्ये ४ लाख ६३ हजार ७५८ मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले. तर, गतवेळी पेक्षा यंदा २९ हजार १८४ मेट्रिक टनाने राज्याचे मत्स्य उत्पादन वाढले आहे, अशी माहिती राज्याच्या मत्स्य विभागाने दिली.
मत्स्य उत्पादनावर दृष्टिक्षेप जिल्हा २०२३-२४ २०२४-२५ पालघर २९,६९६ ३१,१८१ठाणे २६,०५७ ५४,४५७मुंबई उपनगर ७८,२९६ ७५,२५४बृहन्मुंबई १,७६,९३० १,७३,०९१रायगड ३३,३५९ ३५,०२७रत्नागिरी ६७,९०७ ७१,३०३सिंधुदुर्ग २२,३२९ २३,४४५* उत्पादन (मेट्रिक टनमध्ये)