Fire to the chemical company in the location | तळोजात रासायनिक कंपनीला आग
तळोजात रासायनिक कंपनीला आग

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कॉन्गिझंट या रासायनिक कंपनीला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याने एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली. रसायनांच्या गळतीमुळे ही आग लागली असून त्यात संपूर्ण कंपनी खाक झाली. कंपनीच्या आवारातील झाडेदेखील जळाली आहेत.

तळोजा एमआयडीसीमधील भूखंड क्रमांक डब्ल्यू २१६ या जागेवर कॉन्गिझंट हा कारखाना आहे. या ठिकाणी असलेल्या ज्वलनशील रसायनामुळे संपूर्ण कंपनी भस्मसात झाली. मध्यरात्री घटना घडल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास उशीर झाला. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नसली तरी कंपनी प्रशासनाची हलगर्जी या घटनेला कारणीभूत आहे. आगीची तीव्रता जास्त असल्याने आजूबाजूच्या दोन कंपन्यांनाही झळ बसली आहे. कॉन्गिझंट कंपनीच्या आवारात उभी असलेली दुचाकी भक्षस्थानी पडली असून झाडेदेखील पूर्णपणे जळाली आहेत. घटनेनंतर गळती झालेले रसायन कंपनीलगतच्या नाल्यातून वाहून गेल्याने ही आग २०० ते ३०० मीटरपर्यंत पसरली. अग्निशमन यंत्रणेने दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. तळोजा एमआयडीसीमध्ये एकूण ३५० रासायनिक कारखाने आहेत. कंपन्यांच्या हलगर्जीमुळे वारंवार अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांत येथील तीन कंपन्यांमध्ये आगीच्या घटना घडल्या आहेत. कंपनीतील सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कॉन्गिझंट कंपनी प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

संबंधित रसायन ज्वालाग्राही असल्याने आगीने त्वरित पेट घेतला. या घटनेत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. आमचे पथक या संदर्भात चौकशी करीत आहे. कॉन्गिझंट कंपनीवर फॅक्टरी अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात येईल .
- एम. आर. पाटील,
संचालक, औद्योगिक सुरक्षा विभाग

गुन्हा दाखल करा
संबंधित कंपनीत केमिस्ट्री इंजिनीअर कार्यरत होता का, याची चौकशी करण्याची गरज आहे. केवळ कंपन्यांचा उदासीन कारभारच याला जबाबदार आहे. त्यामुळे संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केली आहे.


Web Title: Fire to the chemical company in the location
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.