- अमुलकुमार जैन, बोर्ली-मांडलामुरूड तालुक्यातील नांदगाव येथील १३१ वर्षांची ब्रिटिशकालीन इमारत जीर्ण झाली असून कोसळण्याच्या स्थितीत आहे. या इमारतीची डागडुजी करून ब्रिटिशकालीन ठेवा म्हणून त्याची जपणूक करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. १४ जुलै, १८८५मध्ये या दुमजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी १९६१पासून रायगड जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची शाळा या ठिकाणी भरत होती; परंतु २०१६च्या मुसळधार पावसामुळे इमारतीचे स्लॅब ढासळले. विद्यार्थ्यांच्या जीवास धोका उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामशिक्षण समिती आणि मुरूड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने त्या ठिकाणी इमारत धोकादायक असल्याचा फलक लावून विद्यार्थ्यांना नांदगाव येथील रायगड बाजारच्या इमारतीमध्ये आणि भंडारी समाजाच्या समाजमंदिरात जागा उपलब्ध करून दिली आहे. शाळेची नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव मुरूड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी टी. एस. गवळी यांनी जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. सर्व शिक्षा अभियानचे कनिष्ठ अभियंता अक्षय पाटील यांनी शाळेला भेट देऊन त्याच्या दुरु स्तीबाबत येणाऱ्या खर्चाचा अहवाल गटशिक्षण अधिकारी यांच्यामार्फत पाठविला आहे. लवकरात लवकर या इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.१३१ वर्षे जुन्या शाळेच्या इमारतीची पाहणी कनिष्ठ अभियंता अक्षय पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संदीप चव्हाण यांनीसुद्धा केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेकडे अहवाल पाठविण्यात आला असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. -टी. एस. गवळी, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, मुरूडनांदगाव येथील ब्रिटिशकालीन १३१ वर्षांची जुनी ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या शाळेतून अनेक पिढ्या घडल्या आहेत. या वास्तूचे जतन व्हावे यासाठी नांदगाव ग्रामपंचायतीने एक ठराव घेतला. त्या ठरावाची प्रत पंचायत समिती मुरूड आणि रायगड जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आली. - विलास सुर्वे, सरपंच, नांदगाव
१३१ वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन इमारतीचे अस्तित्त्व धोक्यात
By admin | Updated: February 12, 2017 03:13 IST