बोर्ली-मांडला/मुरुड : रायगड जिल्ह्यात रस्त्यांची सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यामुळे अलिबाग, मुरुडकडे येणाऱ्या पर्यटकांनी पाठ फिरविल्यामुळे पर्यटनस्थळे तसेच समुद्रकिनारे ओस पडली आहेत. याचा फटका पर्यटन व्यवसायाला बसत आहे.पळस्पे फाट्यापासून गोवा आणि मुरु ड जंजिऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पेण ते वडखळ, वडखळ ते अलिबाग, अलिबाग ते रेवदंडा आणि रेवदंडा ते मुरु ड, रेवदंडा ते रोहा या मार्गावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पेण ते वडखळ दरम्यान वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. पेण ते वडखळ हे अंतर सात ते आठ कि.मी. एवढे असून वाहतूक कोंडीच्या वेळी ते अंतर पार करण्यासाठी दोन ते अडीच तास लागत आहेत. त्याचप्रमाणे रेवदंडा ते अलिबाग हे अंतर जेमतेम मिनीडोरने ४० मिनिटांचे आहे. मात्र आता त्याला सुद्धा एक ते सव्वा तास लागत आहे. त्यामुळे पर्यटकांनी अलिबाग-मुरु डकडे पाठ फिरविली आहे. एरवी पर्यटकांनी सलग आलेल्या सुट्या किंवा शनिवार, रविवार गजबजणारे अलिबाग तालुक्यातील अलिबाग, मांडवा, किहीम, आक्षी, रेवदंडा, नागाव, त्याचप्रमाणे मुरु ड तालुक्यातील साळाव येथील बिर्ला मंदिर, कोर्लई किल्ला, बोर्ली, काशिद, नांदगाव, मुरुड येथील समुद्रकिनारे, जंजिरा किल्ला, फणसाड अभयारण्य ओस पडले आहेत. त्यामुळे पर्यटनावर आधारित व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला आहे. अलिबाग आणि मुरु ड तालुक्यात लहान-मोठी चारशे ते पाचशे हॉटेल्स, उपाहारगृहे आहेत. मात्र पर्यटक येत नसल्याने या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. पावसाळ्यातील चार महिने पर्यटक येत नसल्याने बजेट कोलमडले असून त्यातच रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांनी पाठ फिरविली असल्याने आर्थिक संकट निर्माण होण्याची भीती काही व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त के ली. जोपर्यंत रस्त्यांची अवस्था सुधारत नाही तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहणार असल्याचे काशिद येथील व्यावसायिक आशा मोरे यांनी सांगितले आहे. (वार्ताहर)
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे पर्यटन व्यवसायाला फटका
By admin | Updated: October 15, 2016 06:53 IST