सिकंदर अनवारे, दासगावमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सध्या वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे वाहतूककोंडी तसेच अपघातांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा अवस्थेत महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांच्याकडे इंदापूर ते कशेडी असा ६० किमीचा टप्पा असताना त्यांच्याकडे गस्त घालण्यासाठी फक्त एक जीप व दोन दुचाकी आहेत. जीप ठिकठिकाणी गंजली असून दरवाजे खराब झाले आहेत, तर वेळोवेळी इंजिनाचे काम काढत असल्याने ती नादुरुस्त अवस्थेत आहे. दोनमधून एक मोटारसायकलही बंद आहे. अशा परिस्थितीत महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांना अपघात, वाहतूककोंडी, बेशिस्त चालवणाऱ्या वाहनांचा पाठलाग करणे, संशयितांचा पाठलाग करणे अनेक समस्यांना तोंड देणे कठीण झाले आहे.महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाडकडे इंदापूर ते पोलादपूर कशेडी असे ६० किमीचे अंतर आहे. सध्या शाळांना पडलेली सुटी व दुसऱ्या राज्यातून कोकणात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे छोटे-मोठे अपघात, वाहतूककोंडी ही दर दिवशी या मार्गावर पहावयास मिळत आहे. महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाडमध्ये १ अधिकारी व १३ कर्मचारी काम करीत आहेत. मात्र अशा परिस्थितीत या वाहतूक शाखेमध्ये खात्याच्या दोन मोटारसायकली व एक बोलेरो जीप आहे. दोन मोटारसायकलमधून एक मोटारसायकल बंद अवस्थेत आहे, तर बोलेरो जीपची अवस्था बिकट झाली आहे. ती ठिकठिकाणी गंजली आहे. दर दोन दिवसाने इंजिनचे काम काढत आहे. एकदम भंगार अवस्थेत झाली आहे. अशा वाहनाच्या परिस्थितीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा मन:स्ताप झाला आहे. इंदापूर ते कशेडी हद्दीत वाहतूककोंडी किंवा अपघात झाला तर या वाहनांच्या बिकट परिस्थितीमुळे घटनास्थळी वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे. कर्मचाऱ्यांना अशा वेळी आपल्या स्वत:च्या वाहनांचा वापर करावा लागतो किंवा एखाद्या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनामधून बसून घटनास्थळी जावे लागते. यामुळे वेळेवर सेवा देणे ही मोठी गंभीर बाब महामार्ग पोलीस शाखा महाड यांच्यासमोर बनली आहे. राष्ट्रीय महामार्गावर झाडे कोसळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. झाडे तोडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम एकमेव ही वाहतूक शाखा करत असते. मात्र गाड्यांशी संबंधित असणाऱ्या खात्याने या समस्येकडे लक्ष देवून नवीन गाडी देवून महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांची समस्या दूर करावी, अशी मागणी या वाहतूक शाखेकडून केली आहे.
खराब वाहनामुळे महामार्ग पोलिसांची क सरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 01:43 IST