लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग/ पालघर: अवैध मासेमारी कोकणातील गंभीर समस्या आहे. यासाठी गस्ती नौका आहेत, मात्र त्यांना मर्यादा असल्याने अवैध मासेमारी करणाऱ्यांचे फावले आहे. त्यामुळे मत्स्य विभागाने आता यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचे ठरवले आहे. यामुळे अवैध मासेमारी बोटींवर कठाेर कारवाई शक्य होणार असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त संजय पाटील यांनी सांगितले. या कार्यप्रणालीचे उड्डाण व आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे उद्घाटन आज (गुरुवारी) स. १० वा. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.
कोकणातील सात जिल्ह्यांत सात ड्रोन कंट्रोल रुम्स तयार करण्यात येणार असून नऊ अत्याधुनिक ड्रोनची नजर राहणार आहे. ड्रोनद्वारे अवैध मासेमारीवर लक्ष तर राहीलच शिवाय किनारपट्टीवरील क्षेत्र देखरेखीखाली येणार आहे. हे ड्रोन सागरी पोलिस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार आहेत. ड्रोन प्रणालीद्वारे राज्याच्या ७२० कि.मी. लांबीच्या समुद्र किनाऱ्यापासून राज्याच्या सागरी हद्दीपर्यंत म्हणजे १२ सागरी मैल अंतरापर्यंत ड्रोनद्वारे अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर नजर ठेवून पुराव्यासह कारवाई करण्याकरिता ड्रोन प्रणालीच्या वेबसोल्युशन/स्ट्रिमिंगचा पुरावा म्हणून वापर करण्यात येणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती ड्रोन?
- राज्यातील सात सागरी जिल्ह्यांकरिता एकूण ९ ड्रोनची (शिरगाव-पालघर (एक), उत्तन-ठाणे (एक), गोराई-मुंबई उपनगर (एक), ससुनडॉक-मुंबई शहर (एक), रेवदंडा व श्रीवर्धन रायगड (दोन), मिरकरवाडा व साखरीनाटे रत्नागिरी (दोन) आणि देवगड-सिंधुदुर्ग (एक) सेवा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून घेण्यात आली आहे.
- आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालयात ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणालीचे नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) कार्यान्वित करण्यात आलेला आहे.