महाड : महाड शहरात डेंग्यूसदृश साथीच्या तापाने अनेक रुग्ण हैराण झाले असून सोशल मीडियावर काल रात्रीपासून पाठविण्यात येत असलेल्या डेंग्यूबाबतच्या मेसेजेसमुळे शहरातील नागरिकांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरात गेल्या महिन्याभरापासून डेंग्यूसदृश तापाची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या आठ - दहा दिवसांपासून अशा प्रकारचा ताप असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यातही हे रुग्ण उपचार घेत असून एकेका कुटुंबात तीन ते चार रुग्ण असल्याचे दिसून येत आहेत.या पार्श्वभूमीवर काल रात्री व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या गु्रपवर आलेल्या मेसेजेसमुळे तर शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या मेसेजेसमध्ये महाड शहर डेंग्यूचा फैलाव झालेले शहर म्हणून घोषित करण्यात आलेले असून चारशेपेक्षा अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. या रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढत आहे, तरी कुणीही महाडला जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे. याबाबत काही प्रमाणात तथ्यही असल्याची चर्चा शहरात होत असली तरी सोशल मीडियावरील या मेसेजेसमुळे नागरिकांमध्ये डेंग्यूची दहशत निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी महाड शहरात डेंग्यूसदृश परिस्थिती असल्याचे मान्य केले. ३ आॅगस्टपर्यंत शहरातील सर्व पॅथॉलॉजी लॅबच्या अहवालानुसार एकूण १६६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती डॉ. जगताप यांनी दिली. यापैकी बहुतांश रुग्ण हे शहरातीलच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नगरपरिषद प्रशासनाने स्वच्छतेबाबतची काळजी घेणे अत्यावश्यक असून स्वत: नागरिकांनीही याबाबत सतर्क राहावे, असे आवाहन डॉ. जगताप यांनी केले आहे. शहरात नगरपरिषदेकडून जंतुनाशक फवारणी केली जात असली तरी अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेली गटारे आजही दिसून येत असल्याने शहरात संताप व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)
महाडमध्ये डेंग्यूचा फैलाव
By admin | Updated: August 5, 2015 00:26 IST