लोकमत न्यूज नेटवर्क , वडखळ : ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये बालकांसाठी घरपोच वाटप होणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटामध्ये मृत उंदीर आढळला. यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत वडखळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीन अंगणवाड्या आहेत. अंगणवाडी क्र. ३ मध्ये ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांसाठी घरपोच वाटप करण्यासाठी येणाऱ्या मल्टी मिक्स सिरियल्स ॲण्ड प्रोटिन्सच्या पाकिटात एक मृत उंदीर आढळून आला.
पोषण आहार पाकिटात मृत उंदराचे अवशेष आढळून आले आहेत. ते पॅकेट पंचनामा करून पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. प्रयोगशाळेतून अहवालानंतर वरिष्ठ अधिकारी पुढील कारवाई करतील. डी. एच. जाधव, एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प विकास अधिकारी, पेण
अंगणवाडीला भेटअंगणवाडी सेविकेच्या लक्षात ही बाब आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गटविकास अधिकारी सोनल सूर्यवंशी यांनी अंगणवाडीला भेट देऊन माहिती घेतली. एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे अधिकारी प्रमोद पाटील यांनीही भेट देऊन पाहणी केली.