अलिबाग : शेतकरी माता-पित्यांची कन्या महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शेतात राबत होती; पण जिद्द होती पोलीस अधिकारी बनण्याची. पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पोलीस सेवेत दाखल होऊन अलिबाग पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पदावर विराजमान झालेल्या स्वप्नाली दत्तात्रेय पलांडे यांची वाटचाल तरुणाईला प्रेरणा देणारी आहे.पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली पलांडे यांना नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या पोलीस ठाण्यातच ‘लोकमत-स्त्रीशक्ती गौरव पुरस्कार’ अलिबागच्या उपनगराध्यक्ष आणि महिला फौजदारी वकील अॅड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.माझ्या आयुष्याच्या या प्रवासात आज प्रथमच माझा गौरव करण्यात आला, महिला नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करतात, मात्र आम्ही महिला पोलीस कर्तव्यावर असल्याने गणवेशात असतो, आमच्या या कार्याचा ‘लोकमत’ कडून गौरव होत आहे, याचा आनंद आहे. ‘लोकमत’ च्या सामाजिक बांधिलकीला खरच सॅल्यूट, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया स्वप्नाली पलांडे यांनी दिली आहे.पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मुखई हे स्वप्नाली पलांडे यांचे मूळ गाव. गावातच १०वीपर्यंतचे शिक्षण झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी शिरूर येथे पूर्ण केले. इंग्रजी-साहित्य या विषयात त्यांनी बी.ए. केले. बी.ए.च्या शेवटच्या वर्षालाच असताना २००६मध्ये त्या ‘महिला पोलीस कॉन्स्टेबल’ म्हणून पुणे ग्रामीण पोलीस दलात दाखल झाल्या. नोकरी करत असताना पुणे विद्यापीठात बहिस्थ विद्यार्थी म्हणून प्रवेश घेऊन, त्यांनी इंग्रजी विषयात एम.ए. केले. २०११मध्ये महाराष्टÑ लोकसेवा आयोगाची ‘पोलीस उपनिरीक्षक’ या पदाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या. २०१२-१३ मध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले. आॅक्टोबर २०१३ मध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.रायगड जिल्ह्यातील नागोठणे, रेवदंडा, कर्जत आणि रोहा पोलीस ठाण्यात अत्यंत प्रभावी कामगिरी करून आता त्या अलिबाग पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. उपक्रमाच्या आयोजनाकरिता अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे व त्यांच्या सहकाºयांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
शेतक-याची मुलगी झाली पोलीस उपनिरीक्षक, स्वप्नाली पलांडे यांना ‘लोकमत स्त्रीशक्ती गौरव’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 03:06 IST