पोलादपूर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत, त्यातच महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता कोणत्याही वेळी वीजपुरवठा सातत्याने खंडित करण्यात येत असून चौकशीकरिता कार्यालयात फोन केला असता उडवाउडवीची व दिशाभूल करणारी उत्तरे देण्यात येत आहेत. काही वेळा तर महावितरणचे अधिकारी फोन घेणेही टाळत आहेत. परिणामी ग्राहकांना असह्य उकाडा व महावितरणचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोणत्या कारणासाठी वीज पुरवठा बंद केला आहे, खंडित पुरवठा कधी सुरळीत होणार किंवा महावितरणने भारनियमन सुरू केले आहे याबाबत ग्राहकांना कोणतीही माहिती मिळत नाही. महावितरणकडून कोणत्याही वेळी वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने शासकीय कार्यालयांतील व बँकेतील कामकाज ठप्प होत असून दूर गावातून कामासाठी आलेल्या नागरिकांना किरकोळ कामासाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत. सरकारी कार्यालयात कामे वेळेवर होत नाहीत. (वार्ताहर)
खंडित वीजपुरवठ्याने नागरिक हैराण
By admin | Updated: April 21, 2017 00:22 IST