पनवेल - एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून तब्बल १३ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खारघर सेक्टर २१ येथे राहणाऱ्या अनिरबान बिनेंद्रकुमार तिवारी (४५) यांची मुलगी एलीना तिवारी (१७) हिला एमबीबीएससाठी प्रवेश घ्यायचा होता. या वेळी त्यांच्या मोबाइलवर मिसव्ह एडवायझरी अँड एडुकेन सर्व्हिसेसतर्फे त्यांना एक मेसेज आला. यात एमबीबीएसला अॅडमिशन करून देतो असे नमूद करून संपर्कासाठी मोबाइल नंबर देण्यात आला होता. त्या नंबरवर तिवारी यांनी संपर्क साधला असता फोनवर संजय मिश्रा यांनी अॅडमिशन बरोबर फ्रेन्चायजीचेही काम करत असल्याचे सांगितले आणि वैद्यकीय कॉलेजमधील प्रवेशाचे रेट सांगितले. त्या वेळी सेन्ट जॉन्स कॉलेज बंगळुरू येथे अॅडमिशनसाठी बुकिंग म्हणून ५ लाख आणि त्यानंतर १० लाख रुपये भरण्यास मिश्रा यांच्याकडून सांगण्यात आले.तिवारी यांनी प्रवेशासाठी मिश्रा यांनी दिलेल्या अकाउंटमध्ये जवळपास १३ लाख २९ हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर अॅडमिशन झाले असून मुलीच्या कागदपत्रांसह बंगळुरू येथे या, असे मिश्रा यांनी सांगितले. त्याप्रमाणे तिवारी बंगळुरू येथे गेले असता, प्रवेशप्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तिवारी यांनी मिसव्ह एडवायझरी अँड एडुकेन सर्व्हिसेस या कंपनीचे पार्टनर संजय मिश्रा व मोहम्मद आदाम यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक, १३ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 03:32 IST