आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्ह्यात स्वयंअर्थसहाय्यीत तत्त्वावर ३१ खासगी शाळांना मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील ३० शाळा या इंग्रजी माध्यमांच्या आहेत. ग्रामीण भागात मोठ्या संख्येने इंग्रजी माध्यमांच्या शाळा निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांचा कल हा इंग्रजीकडे वाढू लागल्याचे स्पष्ट होत आहे.प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क कायदा लागू झाल्याने शाळांचीही संख्या वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात सुमारे ३७१ मराठी माध्यमांच्या शाळा आहेत, तर सुमारे १२३ या इंग्रजी माध्यमांच्या शाळा असून यामध्ये आता २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात नव्याने ३० इंग्रजी माध्यमांच्या शाळांची भर पडली आहे. स्वयंअर्थसहाय्यीत तत्त्वावर खासगी नवीन शाळांना शैक्षणिक वर्ष २०१५-१६ करिता मान्यता देणे, विद्यमान शाळांचा दर्जा वाढविणे या करिता ३१ जुलै २०१४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. प्रस्तावांची छाननी करून पात्र प्रस्तावांवर सरकारने जिल्ह्यात नवीन ३१ शाळांना मान्यता दिली आहे. त्यामध्ये एकच शाळा ही मराठी माध्यमाची असून उर्वरित ३० शाळा या इंग्रजी माध्यमांच्या आहेत. स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याने टिकून राहायचे असेल, तर इंग्रजीतून शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. इंग्रजीशिवाय पर्याय नसल्याचे दिसते, असे येथील पालक सुयोग आंग्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
शिक्षणाचा ट्रेंड बदलतोय
By admin | Updated: July 24, 2015 03:17 IST