उरण : चिरनेरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ‘बर्ड फ्लू’विरोधात रविवारपासून सुरू केलेली मोहीम आटोपती घेतली. बर्ड फ्लूची साथ रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून दोन दिवसांत १,२३७ कोंबड्या नष्ट केल्या आहेत. त्यामुळे बाधित ४३ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार असल्याची माहिती रायगड जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे यांनी दिली.
बर्ड फ्लूच्या साथीत तीन शेतकऱ्यांच्या १२० कोंबड्या दगावल्या होत्या. केंद्रीय आरोग्य विभागाच्या तपासणीत बर्ड फ्लूनेच कोंबड्या दगावल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी उपाययोजना म्हणून ९ फेब्रुवारीपर्यंत बाधित क्षेत्र सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ४३ शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाईची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
पोल्ट्री फार्म मजुरांची आरोग्य तपासणी- उरण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील पोल्ट्री फार्मवरील काम करणारे मजूर कामगारांच्या आरोग्य तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली होती. - या मोहिमेमध्ये बर्ड फ्लूचा एकही रुग्ण आढळून आला नाही. मात्र साध्या ताप, थंडी, सर्दी, खोकल्याचे चार रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार केले आहेत. आरोग्य पथक काही दिवस या ठिकाणी कार्यरत राहणार असल्याची माहिती उरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र ईटकरे यांनी दिली.- बाधित क्षेत्रातील कोंबड्या, पक्षी, अंडी, पशुखाद्य नष्ट करण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आरोग्य विभाग व पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना ४३ शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाईची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मात्र, परिसरात सर्वेक्षण सुरूच राहणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.