भिवपुरी रेल्वे स्थानकात पादचारी पुलाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:52 AM2018-04-09T02:52:42+5:302018-04-09T02:52:42+5:30
भिवपुरी रेल्वे स्थानकामध्ये कर्जतच्या बाजूला पादचारी पूल बांधण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. पूल नसल्याने डिसकळ परिसरातील प्रवाशांना रूळ ओलांडून यावे लागत होते.
कर्जत : भिवपुरी रेल्वे स्थानकामध्ये कर्जतच्या बाजूला पादचारी पूल बांधण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. पूल नसल्याने डिसकळ परिसरातील प्रवाशांना रूळ ओलांडून यावे लागत होते. प्रवासी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर कर्जतच्या बाजूला नवीन पूल मंजूर झाला असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
भिवपुरी रोड स्थानकालगत अनेक उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे स्थानकात कायमच प्रवाशांची वर्दळ असते. बरेचदा भिवपुरी रेल्वे स्थानकात मालगाडी उभी असल्यामुळे भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाइलाजाने उभ्या असलेल्या मालगाडीच्या खालून येऊन फलाटावर यावे लागते. याप्रकाराने काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. भिवपुरी रोड फलाटावर कर्जत दिशेकडे पूल व्हावा यासाठी सुमारे पावणेचार हजार प्रवाशांच्या सह्यांचे निवेदन रेल्वे मंत्री तसेच डीआरएम यांना २0१५ मध्ये दिले होते. मात्र तीन वर्षे उलटून गेली तरी काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असलेल्या पंकज मांगीलाल ओसवाल यांची भेट घेतली. ओसवाल यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांनी त्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल, असे कळविले होते.
त्यानंतर ओसवाल यांनी पाठपुरावा केला असता तुमची सूचना मुंबई डिविजनने नोंद केली आहे व वरिष्ठांकडे पाठवली आहे. आता अस्तित्वात असलेला पूल हा पुरेसा आहे. तरी सुद्धा भिवपुरी रेल्वे स्थानकात कर्जतकडे पुलाची किती आवश्यकता आहे त्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल असे नेहमीप्रमाणे देण्यात येणारे उत्तर दिले. त्यावर पंकज ओसवाल यांनी सुद्धा याबाबतीत लगेचच मुंबई डिविजनने वरिष्ठांकडे पाठवलेली आपली सूचनेची प्रत आपणास द्यावी. तसेच रेल्वे प्रशासनाने या बाबतीत लवकरात लवकर सर्व्हे करून त्वरित पूल बांधण्यात यावा, अशी मागणी केली व अनेक प्रश्न उपस्थित केले.
रेल्वे प्रशासनाने भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात कर्जतकडे पुलाची मंजुरी देण्यात आली असून सदर काम हे २0१८ - १९ या वर्षामध्ये घेण्यात येणार असल्याचे तसेच टेंडरिंगची प्रक्रि या सुध्दा सुरू करण्यात आली असल्याचे कळविले आहे. तसेच भिवपुरी रेल्वे स्थानकावर सतत मालगाडी उभी असल्या कारणाने होणाºया त्रासाबद्दल ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले असता या बाबतीत सुद्धा रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांची दिलगिरी व्यक्त केली आहे. ओसवाल यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल भिवपुरी रोड येथील प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते गो.रा.चव्हाण, पुरुषोत्तम पाटील, रोशन साळोखे, किशोर गायकवाड, उत्तम गायकवाड आदींनी त्यांचे आभार मानले.
>भिवपुरी रेल्वे स्थानकात कर्जतकडे पूल होणे फारच गरजेचे आहे. याबाबत पाठपुरावा केल्याने रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. उभारण्यात येणारा पूल लवकरात लवकर व वेळेत पूर्ण करावा हीच अपेक्षा.
- पंकज ओसवाल, कर्जत
भिवपुरी रोड रेल्वे स्थानकावर कर्जत एंडकडे पूल असावा ही मागणी पंकज ओसवाल यांनी पाठपुरावा करून मंजूर करून घेतली त्याबद्दल त्यांचे व रेल्वे प्रशासनाचे आभार.
- किशोर गायकवाड,
रेल्वे प्रवासी, भिवपुरी रोड