अलिबाग : पेण तालुुक्यातील मुंगेशी गौण खनिज परवाना रद्द करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेले हरिष बेकावडे यांची प्रकृती खालावली आहे. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी बेकावडे यांची तपासणी केली. बेकावडे यांचे तब्बल १० किलो वजन कमी झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता वाढली आहे.शुक्रवारपासून अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकावडे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्याचप्रमाणे पेण तहसीलदार येथील उपोषणचा २२वा दिवस आहे. तेथेही त्यांचे समर्थक उपोषण पुढे नेत आहेत. तर नदीपात्रातील आंदोलनाला ३१ दिवस झाले आहेत.येथील गौण खनिजांचे उत्खनन केल्याने पर्यावरणाला धोका पोहोचत आहे. दिवसाला ६० ब्रास खडींचे उत्खनन करण्यात येत आहे. संबंधितांनी उत्खनन करण्यासाठी फक्त प्रशासनाकडे अर्ज केला होता. त्याला परवाना नसतानाही अर्जदाराने उत्खनन सुरू केले आहे. मात्र, प्रशासनाकडून डोळेझाक सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तेथील खडी क्रशर प्लॉन्ट बंद करण्याचे आदेश पेण तहसीलदार यांनी दिले. मात्र, प्लॉन्ट सिल का करण्यात आला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर प्रशासनाने विदुर तांडेल याच्या मालकीच्या जागेत निकेश तांडेल याला परवाना देऊन आदिवासी समाजाच्या भावनांवर मीठचोळल्याची भावना आंदोलकांची झाली आहे. त्यामुळे तातडीने परवाना रद्द करावा, खोटे दाखले देणारा मंडळ अधिकारी डी. डी. निकम याला तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली आहे.
मुंगेशी गौण खनिज परवाना विरोधी उपोषण आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:12 IST