महाड : तक्र ार अर्जांच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आलेल्या दोन गटांमध्ये पोलीस ठाण्यातच बाचाबाची आणि हाणामारी होण्याचा प्रकार गुरुवारी महाड तालुका पोलीस ठाण्यात घडला. या वादामध्ये मध्यस्थी करून तो मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. त्याचप्रमाणे ठाणे अंमलदार कक्षाची नासधूस करण्यात आली. या प्रकरणी चौदा जणांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.महाड तालुक्यातील नेराव (सुतारवाडी) येथील कोरपे आडनावाच्या दोन भावांमध्ये जमिनीमध्ये केलेल्या अतिक्र मणावरून वाद होता. यासंदर्भात दोन्ही भावांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्र ार अर्ज दाखल केला होता. गुरुवारी या दोन्ही गटांना चौकशीसाठी महाड तालुका पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते. ठाणे अंमलदार सचिन गुरव हे या दोन्ही तक्र ारदारांशी चर्चा करीत असताना, अचानक या दोन तक्र ारदार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळेस त्यांना शांत करण्याचा प्रयत्न ठाणे अंमलदार गुरव हे करीत असताना त्यांची गळपट्टी धरून त्यांना मारहाण करण्यात आली.गुरव यांना होत असलेली मारहाण पाहून त्यांना सोडविण्यासाठी पोलीस नाईक बामणे हे गेले असता त्यांनाही धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. या हाणामारीत ठाणे अंमलदार कक्षातील शासकीय मालमत्तेचेही आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले असून, दोन्ही तक्र ारदारांचे अर्जही फाडून टाकण्यात आले.या घटनेची माहिती मिळताच महाडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे, महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सस्ते यांनी त्वरित महाड तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली.महाड तालुका पोलीस ठाणे हे महाड शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येते. त्यामुळे संजय गुरव यांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार भागोजी सुतार, दगडू सुतार, वासुदेव सुतार, संतोष सुतार, सुनील कोरपे, गणेश सुतार, शेखर कोरपे, विठ्ठल चिखले, संतोष सुतार, भाऊ सुतार, भागवत सुतार, घनश्याम सुतार, राजेंद्र कोरपे, शुभम कोरपे (सर्व रा. नेराव सुतारवाडी, ता. महाड) यांच्याविरुध्द सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. (वार्ताहर)
महाड तालुका पोलीस ठाण्यात हाणामारी
By admin | Updated: April 14, 2017 03:14 IST