पेण : नेहमीच येतो उन्हाळा आणि पाण्यासाठी दूरदूर पळा, या नात्याने मार्च महिन्यात अचानक पारा वरती चढल्याने पाणीटंचाईच्या झळा यंदा दाहक होणार आहेत. गतवर्षी ७० टक्केच सरासरी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शासनाला ३० टक्क्याची पाण्याची तूट भरून काढण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. प्रशासकीय अधिकारी व पाणीपुरवठा विभाग आताच चिंतेत आहेत. पाण्याच्या या संघर्षाला कारण आहे ते रायगड जिल्ह्याच्या कोलाड पाटबंधारेविभागाच्या २८ प्रकल्पांमध्ये शेष ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास पाण्यासाठी आणीबाणीचा प्रसंग उद्भवू नये याची प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. रायगडातील पाणीटंचाईचे दाहक चित्र या वर्षात पहावयास मिळणार आहे.गतवर्षी मान्सून हंगाम सरासरी गाठण्याइतपत होता. नेहमीच भरपूर पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील अनेक गावे पुराखाली जातात. मात्र आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. जंगल, डोंगर नष्ट होत असल्याने त्याचा परिणाम पर्जन्यमानावरही होत आहे. डोंगरच्या डोंगर फोडून, वनराई जाळून नष्ट करून रॉयल्टीच्या नावाखाली चालणाऱ्या या गोरखधंद्याकडे महसूलच्या कर्मचाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे. पाटबंधारे विभागाच्या २८ प्रकल्पाची संचय क्षमता ६८ हजार २८६ दशलक्ष घनमीटर एवढी असताना आजमितीस ३६ हजार ३८२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शेष आहे. ५३ टक्के सरासरी पाणी साठा शिल्लक आहे. २८ पैकी सहा प्रकल्पामध्ये ७० पेक्षा अधिक पाणीसाठा ११ प्रकल्पामध्ये ५० टक्के पाणीसाठा तर उर्वरित ११ प्रकल्पामध्ये ५० टक्क्याहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. मार्च उजाडताच उन्हाच्या झळांना प्रारंभ झाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात २४१ गावे ३८४ वाड्या मिळून ६३३ ठिकाणी पाणीटंचाईची आकडेवारी होती. या कामी शासकीय ३६ तर खाजगी ३८ असे ७४ टँकर वापरण्यात आले. तरीही दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा यावर्षीच्या पावसाच्या तुटीने वाढणार आहे. याचे योग्य नियोजन न झाल्यास हंडे मोर्चांनी शासकीय कार्यालये दणाणणार आहेत. (वार्ताहर)
२८ प्रकल्पातील पाणीसाठा घटला
By admin | Updated: February 29, 2016 01:57 IST