तळा : रविवारी सकाळपासून मान्सूनच्या पावसाला सुरु वात झाली, यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आले. तालुक्यात तळा शहरात १०९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाने मात्र नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पहावयास मिळाले.२५ मेला रोहिणी लागल्यानंतर साधारणपणे ५-६ दिवसात बळीराजा धूळफेकीच्या पेरणीला सुरुवात करतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात थोडा पाऊस पडला आणि पेरणी झालेली भाताची रोपे हळूहळू उगवू लागली. परंतु दरम्यान पाऊस पडलाच नाही. कडक उन्हामुळे भाताचे तरवे करपू लागले, यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत पडला. आता पुन्हा दुबार पेरणी करावी लागणार, डबल खर्च करावा लागणार अशा चिंतेत असतानाच तालुक्यात रविवार सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. दिवसभर जोरदार पाऊस पडला. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. रविवारी सकाळी ८ वा. ते सोमवारी सकाळी ८ वा. पर्यंत साधारणपणे १०९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.गतवर्षी तळा तालुक्यात रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडला होता. यावर्षी देखील शेतकरी तशाच पावसाच्या अपेक्षा करीत आहे. या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकरीवर्गावरील टळले आहे. सोमवारी मात्र पावसाने विश्रांती घेतली. (वार्ताहर)
तळा शहरात १०९ मिलीमीटर पाऊस
By admin | Updated: June 21, 2016 01:34 IST