माथेरान नगर परिषदेचे १० नगरसेवक अपात्र, रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 10:46 AM2021-10-30T10:46:13+5:302021-10-30T10:47:14+5:30

Matheran Municipal Council : माथेरानमधील शिवसेनेचे निवडून आलेले नऊ आणि एक स्वीकृत असे १० नगरसेवक यांनी २७ मे, २०२१ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

10 disqualified councilors of Matheran Municipal Council, decision of Raigad District Collector | माथेरान नगर परिषदेचे १० नगरसेवक अपात्र, रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय  

माथेरान नगर परिषदेचे १० नगरसेवक अपात्र, रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय  

googlenewsNext

- विजय मांडे 

कर्जत :  माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या १० नगरसेवकांना शुक्रवारी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरविण्याचा निर्णय मंजूर केला. माथेरानमधील शिवसेनेचे निवडून आलेले नऊ आणि एक स्वीकृत असे १० नगरसेवक यांनी २७ मे, २०२१ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

२०१६ मध्ये निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर रूपाली आखाडे, प्रियांका कदम, ज्योती सोनावले, संदीप कदम, प्रतिभा घावरे, आकाश चौधरी, सुषमा जाधव, राकेश चौधरी, सोनम दाभेकर आणि स्वीकृत सदस्य चंद्रकांत जाधव अशा १० सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेचे मुख्य सचिव आणि खासदार अनिल देसाई यांनी रायगडचे जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात या नगरसेवकांना अपात्र ठरवावे, अशी याचिका दाखल केली होती. शिवसेनेच्या त्या अर्जावर रायगड जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात ३० जून, २०२१ रोजी सुनावणी झाली. पुढील सुनावणी ५ जुलै रोजी घेण्यात आली. त्यावेळी गटनेते प्रसाद सावंत यांनी  सर्व नगरसेवकांविरोधात वेगवेगळे १० रिट पिटिशन दाखल केले होते.

शिवसेना पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या १० सदस्यांना पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरविण्याची मागणी आम्ही केली होती. पक्षाच्या दृष्टीने असा प्रकार पक्षाच्या शिस्तीत बसणारा नाही, हे दाखवून दिले होते, तर शिवसेना सचिव आदेश बांदेकर, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर हेही आमच्या पाठीशी ठामपणे उभे होते. 
- प्रसाद सावंत, याचिकाकर्ते

आम्ही रायगड जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरोधात राज्याचे नगरविकासमंत्री यांच्याकडे दाद मागणार आहोत. त्यांच्याकडूनही न्याय मिळाला नाही, तर आम्ही मात्र मुंबई उच्च न्यायालयात रायगड जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला आव्हान देणार.
- प्रवीण सकपाळ, अध्यक्ष, माथेरान, भाजप

पालिकेतील अनागोंदी कारभार मान्य नव्हता, म्हणून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. आता आम्हाला अपात्र केले आहे. आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.
- आकाश चौधरी, उपनगराध्यक्ष 

Web Title: 10 disqualified councilors of Matheran Municipal Council, decision of Raigad District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.