भोर : नऱ्हे (ता.भोर) गावाजवळ भाटघर धरणाच्या पाण्यात बुडून अजय नरसिंह पांचाळ (वय २१ रा इंदिरा नगर, हडपसर) याचा मुत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी २ वाजता घडली. याबाबत राजगड पोलीस स्टोशनकडून मिळालेली माहिती अशी की, अजय नरसिंह पांचाळ व त्याचा मित्र प्रवीण रामदास ढवळे (वय २२. रा हडपसर) हे दोघेजण सकाळी दुचाकी गाडीवरून भाटघर धरणावर फिरायला आले होते. दुपारी २ वाजता हे दोघेजण भाटघर धरणाच्या काठावर असलेल्या नऱ्हे गावाजवळ आले. अजय पांचाळ हा धरणाच्या पाण्यात उतरला, तर प्रवीण ढवळे धरणाच्या काठावर बसला होता. खोल पाण्यात गेल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने अजय बुडाला. हे प्रवीणने गावात सांगितल्यावर पोलीस पाटील पंढरीनाथ महादेव गोळे यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर गावातील नागरिक व भोईराज तरुण मंडळाच्या कार्यकत्यांनी अजयचा मृतदेह अडीच तासांनी ४.३० वा बाहेर काढला. त्यानंतर रात्री ८ वा उपजिल्हा रुगणालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला.अजय आणि प्रवीण हे दोघे आपल्या मित्राकडे साताऱ्याला जाणार होते. मात्र त्याच्या मित्राचा फोन न लागल्याने ते भाटघर धरणावर फिरायला आल्याचे समजले. (वार्ताहर)
पुण्यातील तरुणाचा बुडून मृत्यू
By admin | Updated: November 30, 2015 01:55 IST