पुणे : बाजीराव रोडवर वाहनाच्या धडकेत एका पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
संक्रातीच्या खरेदीसाठी तुळशीबाग, शनिपार परिसरात महिलांची झुंबड उडाली होती.
पवन संजय गिते (वय २५, रा. खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. संक्रांतीच्या खरेदीसाठी तुळशीबाग, शनिपार परिसरात महिलांची झुंबड उडाली होती. मृत्यू झालेला तरुण मोबाईलवर बोलत असताना अचानक मिक्सरच्या खाली गेला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यावेळी तरुणाच्या हातात मोबाईल देखील मिळून आला आहे. याप्रकरणी संबंधित टेम्पो, मिक्सर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय टिकोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव रस्त्यावरून पवन हा पायी चालत शनिवारवाड्याकडे निघाला होता. विश्रामबागवाड्यासमोर एका टेम्पो व पाठीमागे असलेल्या मिक्सर खाली पवन आला. त्याच्या डोक्यावरून मिक्सर गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात हा सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास गर्दीच्या वेळी घडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पायी चाललेला तरुण अचानक मिक्सरच्या खाली कसा सापडला हे पोलिसांना लक्षात आलेले नाही. मात्र, त्याच्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळे तो बोलत त्याच्या खाली सापडला असण्याची शक्यता आहे. तो नेमका या परिसरात कशासाठी आला होता. याप्रकरणी तपास सुरू आहे.
------------------
मृतदेह सापडलेल्या महिलेचा मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट
सदाशिव पेठेतील जंगमवाडी मठाजवळील एका काम सुरू असलेल्या इमारतीमध्ये सडलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून होता. या प्रकरणी शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही. मात्र, व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून तिची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, असे वरिष्ठ निरीक्षक विजय टिकोळे यांनी सांगितले.