लाेकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी पेंढार : डुंबरवाडी येथील टोलनाक्यावरील व्यवस्थापकाने आळेफाटा येथील तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली. जुन्नर तालुका मनसेच्यावतीने या प्रकरणी टोलनाक्याच्या व्यवस्थापनाला सज्जड दम दिल्यानंतर यापुढे असा प्रकार होणार नाही, असे सांगून माफी मागण्यात आली.
जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण रस्त्यावर डुंबरवाडी येथे टोलनाका आहे. या टोलनाक्यावर यापूर्वी स्थानिकांकडून आधारकार्ड पाहून सोडले जात असे. गुरुवारी (दि ९) रात्री ८. ३० वाजता आळेफाटा येथील शुभम फापाळे हा तरुण आपल्या मालवाहतूक गाडीत रोजच्याप्रमाणे केळी घेऊन आळेफाट्यावरून ओतुरकडे जात होता. डुंबरवाडी येथील टोलनाक्यावर आल्यानंतर येथील व्यवस्थापक सचिन देवकर याने गाडी थांबवली व आधारकार्डची मागणी केली. आधारकार्ड पाहिल्यानंतर पुन्हा गाडीचे आरसी बुकची मागणी केली. मात्र फापाळे यांच्याकडे आरसी बुक नसल्याने टोलनाका कर्मचारी व फापाळे यांच्यात वाद झाला. यावेळी फापाळे याने आपल्या मोबाईलमध्ये याचे शूटिंग चालू केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊन खाली आपटला. यावेळी फापाळे याने या घटनेची माहिती पुणे जिल्हा मनसे उपाध्यक्ष मकरंद पाटे यांना दिली. यानंतर पाटे हे तत्काळ घटनास्थळी हजर झाले. यावेळी पाटे यांच्यासोबत अनेक मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, ओतूर पोलीस देखील टोलनाक्यावर पोहोचले होते. मनसे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे यांनी यावेळी सविस्तरपणे माहिती घेतली. टोलनाक्यावरील व्यवस्थापकाचा उर्मटपणा लक्षात आल्यानंतर पाटे यांनी सज्जड दम भरला व पुढील काळात असा प्रकार घडल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.
टोलनाका व्यवस्थापक सचिन देवकर याने आपली चूक झाल्याचे कबूल केले व यापुढे असा प्रकार होणार नसल्याचे सांगितले. दरम्यान, फापाळे यांच्या फिर्यादीवरून टोलनाका व्यवस्थापक सचिन देवकर याच्या विरुद्ध ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोट
टोलनाक्यांवरील व्यवस्थापक व कर्मचारी प्रवाशांशी अरेरावीची भाषा करतात आणि उर्मटपणे वागतात. वेळप्रसंगी शिवीगाळही केली जाते. यापुढे जर जुन्नर तालुक्यातील नागरिकांशी अशाप्रकारे कोणी वागण्याचा प्रयत्न केला तर मनसेकडून जशास तसे उत्तर दिले जाईल. टोलनाक्यावर तालुक्यातील स्थानिकांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक सहन केली जाणार नाही.
- मकरंद पाटे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा, मनसे