चाकण : रात्रीच्या वेळी झोपेत विषारी साप चावलेल्या आदिवासी ठाकर महिलेला आठ तासानंतर बेशुद्ध अवस्थेत दवाखान्यात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या प्रयत्नांनी तब्बल पाच दिवसांनी महिला कोमातून बाहेर आली. याबाबतची माहिती की, संगीता राजू पडवळ (वय२७, रा. केंदूर, ता. शिरूर) ही आदिवासी ठाकर समाजातील विवाहिता घरात झोपली असताना मंगळवारी (ता.९) रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास विषारी सापाने दंश केला. यावेळी विंचू किंवा उंदीर चावला असेल असे समजून एवढ्या रात्री दवाखान्यात कसे जायचे म्हणून ती झोपी गेली. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास संगीता ही बेशुद्ध असल्याचे लक्षात आले. एका टमटममधून रुग्ण महिलेस राणूबाई मळा येथील संजीवनी हॉस्पिटल उपचारासाठी नेण्यात आले तो पर्यंत साडेदहा वाजले होते. केंदूर ते राणूबाई मळा हे तब्बल २२ ते २५ किलो मीटरचे अंतर असल्याने रुग्णाला दवाखान्यात आणण्यास उशीरही झाला होता. डॉक्टरांनी तर अशाच सोडली होती, अशा वेळी डॉ. नम्रता निकम, डॉ. पुजारी. डॉ. घुमटकर यांनी महिलेस अतिदक्षता विभागात घेऊन प्रथम कृत्रिम श्वास देऊन उपचार चालू केले. आवश्यक ती औषधे दिली. सलग चार दिवस महिलेकडून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर पाचव्या दिवशी महिलेने प्रतिसाद दिला. डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्या महिलेच्या चेहऱ्यावर जणू बोनस आयुष्य मिळाल्याचा आनंद दिसत होता.
डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे सर्पदंशातून वाचली महिला
By admin | Updated: June 18, 2015 22:34 IST