पुणे : मराठा सेवा संघाच्या वतीने मंगळवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या ४२३व्या जयंतीनिमित्त पुणे शहर वतीने ‘जिजाऊ सेवा’ पुरस्कार पोलीस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे व विशेष शाखेच्या क्रांती पवार यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संघाचे शहराध्यक्ष सचिन आडेकर म्हणाले, मराठा सेवा संघ प्रत्येक स्त्रीमध्ये जिजाऊंना पाहतो आणि म्हणूनच समाजात सेवा करताना घरची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे म्हणाल्या की, या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली असून, यापुढे जिजाऊंच्या विचाराने छत्रपती शिवाजी महाराज घडविण्यासाठी समाजात प्रयत्न करत राहीन.
मराठा सेवा संघाचे केंद्रीय पदाधिकारी राजेंद्र कुंजीर, हनुमंत मोटे, मारुती सातपुते, महेश टेळे पाटील, रघुवीर तुपे, देवीदास लोणकर, स्वाती टेळेपाटील, शोभा लगड, ऐश्वर्या लगड यावेळी उपस्थित होते.