पुणे : ‘भाजपा हा सुसंस्कृत पक्ष असल्याचे वाटत होते, पण आता पुण्यात आल्यावर तो गुंडाचा पक्ष झाल्याचे दिसत आहे, असे फक्त मीच नाही तर शिवसेनाही म्हणत आहे. अशा पक्षातील गुंडांच्या हातात सत्ता देणार का?’ असा सवाल काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. देशाचे व राज्याचेही भाजपा वाटोळे करत असून महापालिकेत त्यांची सत्ता आली तर पुण्याचेही तेच होईल, असे ते म्हणाले.महापालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रचाराला महात्मा फुले समता भूमी येथे शुक्रवारी सायंकाळी राणे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. भाजपाबरोबरच राणे यांनी यावेळी शिवसेनेचाही समाचार घेतला. शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी तसेच पक्षाचे सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते.राणे म्हणाले, ‘‘भाजपा हा केवळ थापा मारणारा पक्ष आहे. सत्तेच्या अडीच वर्षांच्या काळात त्यांनी निवडणुकांमध्ये दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. आता मते मागायला आले तर त्यांना त्या आश्वासनांचे काय झाले, ते विचारा. नोटाबंदीसारखा निर्णय घेत त्यांनी नागरिकांना त्रासच दिला.’’ मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांना आपण जनतेशी बोलतो आहोत, याचे भानच राहिलेले नाही. त्यामुळेच नको त्या भाषेत ते भांडत आहेत. त्यातूनच त्यांची संस्कृती काय आहे, ते दिसते; पण असे बोलून ते महाराष्ट्राची संस्कृती बिघडवत आहेत, कुठे डॉ. हेडगेवार, वाजपेयी, महाजन, बाळासाहेब ठाकरे यांचा विचार व कुठे यांचा विचार, अशी टीका राणे यांनी केली. शहराध्यक्ष बागवे यांनी प्रास्तविक केले. विश्वजित कदम यांनीही त्यांची सत्ता आली तर ते फक्त फसवणूकच करतील, असे त्यांनी सांगितले. आमदार रणपिसे, माजी आमदार दीप्ती चवधरी, अॅड. अभय छाजेड, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, अविनाश बागवे यांचीही भाषणे झाली. काका धर्मावत यांनी सूत्रसंचालन केले. माजी महापौर कमल व्यवहारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
गुंडांच्या हातात सत्ता देणार का?
By admin | Updated: February 11, 2017 02:59 IST