मोरगाव : बारामती तालुक्यातील तरडोलीनजीक धायगुडेवस्ती येथील पूजेसाठी अल्पवयीन मुलीच्या मागणीचा खळबळजनक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. यातील मुख्य सूत्रधाराचा तपास दुसऱ्या दिवशीही सुरू होता. या घटनेप्रकरणी मोठी साखळी असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे. दरम्यान, वाई येथील एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या वतीने सांगण्यात आले. या मुलीची मागणी गुप्तधनासाठी होत होती का, अशी चर्चा सुरू आहे. तरडोली येथील दहावीमध्ये शिकत असलेल्या मुलीची पूजेसाठी देवऋष्याकडून सातत्याने मागणी होत होती. त्यामुळे तिच्या पालकांनी व नातेवाइकांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मंगळवारी (दि. २४) परिसरातील ४ व्यक्तींना ताब्यात घेतले होते; मात्र त्यांचे जबाब घेऊन मंगळवारीच त्यांना सोडून दिले. यांपैकी वाई येथील मोहिते नावाचा इसम पकडला आहे. चौकशीसाठी अद्याप तो ताब्यात आहे; परंतु मोहिते याने आणखी दुसऱ्या व्यक्तींची नावे सांगितल्याने ही साखळी वाढली आहे. तर, मुख्य देवऋषीही अद्याप ताब्यात आलेला नाही. याबाबतचा तपास वडगाव पोलिसांकडून वेगाने सुरू आहे. याबाबत येत्या २ दिवसांत मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना सांगितले. या प्रकरणी मुख्य आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आरोपींच्या मागावर आहेत. सध्या ताब्यात असेलेल्या व्यक्तीकडून वेगवेगळ्या व्यक्तींची नावे उघड होत आहेत. त्यामुळे मुख्य आरोपी सापडल्यानंतरच रीतसर गुन्हा दाखल होईल. - सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक
गुप्तधनपूजा प्रकरणी वाईपर्यंत धागेदोरे
By admin | Updated: May 26, 2016 03:31 IST