भरसभेत गौप्यस्फोट
बारामती : बारामती तालुक्यातील जिरायती भागातील एका सरपंचाने परवा एका ठेकेदाराकडे फोन करत रस्त्याच्या कामासाठी टक्केवारीची मागणी केल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तो सरपंच कोण, अशी चर्चा भरसभेत रंगली.
बारामती येथील एका संस्थेच्या सर्वसाधारण सभेत पवार बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, बारामतीसह जिल्ह्यात विविध विकासकामे आणण्याचा माझा प्रयत्न असतो. मुख्यमंत्री देखील विकासकामांना विरोध करीत नाहीत. मात्र, कार्यकर्त्यांनी परिसरातील कामे दर्जेदार होतील, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे सांगताना पवार यांनी तालुक्यातील सरपंचाने ठेकेदाराकडेच टक्केवारी मागितल्याचा किस्सा सांगितला.
यावेळी पवार यांनी सरपंचाबाबत सांगितले की, सरपंचाने परिसरातील रस्त्याच्या कामासाठी त्या अजितदादांकडे पन्नास हेलपाटे मारले. त्यावेळी ते काम मंजूर झाले. मात्र, तू आमच्याकडे काहीच लक्ष देत नाहीस, असे सांगत टक्केवारीची मागणी केली. यावेळी काही लाख रुपयांची मागणी त्या सरपंचाने ठेकेदाराकडे मागितल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
उपविभागीय पोलीस अधिका-यांना संबंधितांना उचलण्याची सूचना दिली तर गावात त्याची काय किंमत राहिल, असा सवाल पवार यांनी केला. मी छातीठोकपणे सांगतो १९६७ पासून आजपर्यंत विकासाची कामे करताना येथील खासदार, आमदारांनी पाच पैसे कोणत्या कामातील बाजुला घेतले नाहीत. उलट पदरचे करोड रुपये दिले. सीएसआरचा फंड विकासकामांसाठी दिला. आजच्या काळात आमची नावे घेवुन असे प्रकार करता, माझ्याकडे काम आल्यावर मी मार्गी लावतोच, मी जे बोलतो ते मी करतो. कोणी हेलपाटे मारण्याची गरज नाही. मात्र, आमच्या नावाचा वापर करीत खुशाल खोटे सांगता. तुम्हाला काय मिळाले पाहिजे, देवळात वाजवायची घंटा का, असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री पवार यांनी संबधित सरपंचाला लगावला. असे प्रकार पुन्हा माझ्या कानावर आल्यास माझा सर्वांना निर्वाणीचा इशारा आहे. चुकीचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. तो सरंपच राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर किती दिवसांपासून आहे. त्याच्या किती पिढ्या आमच्याबरोबर आहे, याचा विचार करणार नाही. ठेकेदाराने संभाषण ऐकविल्यावर मला टाळता येईना, नाकारता येईना. त्या ठेकेदाराने त्या संभाषणाची क्लीप मला ऐकवली. भ्रष्टाचाराला प्रवृत्त करणे हा गुन्हा आहे. भविष्यात काळजी घ्या, असा इशारा उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला.
————————————