मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले राजगड व किल्ले तोरणा अद्यापही पर्यटनाचा दर्जा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत तर अठरा व बारा गाव मावळ परिसर विकासापासूनच आजही दूरच राहिला असल्याचे चित्र सध्या वेल्हे तालुक्यात पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी झालेली विकासकामे केवळ कागदवरच झाली आहेत.गुंजवणी धरणाबाबत तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी राजकारण केले असून गुंजवणीचे पाणी तालुक्यातील वाजेघर, (बारा गाव मावळ) पासली केळद (अठरा गाव मावळ) तसेच वांगणी परिसर, रांजणे, कोंडगाव परिसरात उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते. तालुक्यात तीन धरणे असुनही या भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी परीस्थिती वेल्ह्यातील जनतेची झाली आहे. आगामी काळात धरणातील पाण्याचे केवळ राजकारणच होणार का? किंवा मुठभर लोकांच्या राजकीय स्वाथार्साठी बंद पाईपलाईनमधून पुरंदरला जाणार का? वेल्हे तालुक्यातील शेतकरी ग्रामस्थांना पाणी कसे मिळणार, याबाबत तालुक्यातील सत्ताधारी पक्ष गप्प का? तर विरोधी पक्षांची भूमिका बजावणारे देखील मूग गिळून गप्प बसले आहेत.वेल्हे तालुक्यास निसर्गाने अद्भूत असे सौंदर्य दिले असून सह्याद्रीच्या पर्वतरांगांत छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक असे लोकप्रिय किल्ले राजगड व तोरणा याच तालुक्यात आहे. मात्र पर्यटनस्थळे करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याचे दिसत आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणूनच आजपर्यंत येथील मावळ्यांचा उपयोग केवळ निवडणुकीपुरता किंवा राजकीय पोळी भाजण्यासाठी केला आहे. हा तालुक्यातील मावळा पुणे, मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात रिक्षा आणि कुल्फी, चहा विक्रेता तसचे मार्केट यार्डात किंवा वाशी मार्केटमध्ये हमाली करताना दिसत आहे. वेल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रोजगार निर्मितीचे साधन नसल्याने येथील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात स्थलांतर होताना दिसत आहे. तर येथील अनेक शेतकरी तालुक्यातील आपली शेती विकून भूमिहीन होत आहेत.तालुक्यामध्ये राजकारण करणारे अनेक राजकीय नेते पुणे शहरात स्थायिक असून तेथूनच तालुक्याचा कारभार चालविला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली असून अजुनही येथील राजकीय नेते हे तालुक्यातील रस्ता, पाणी, वीज याच मुद्यावर निवडणुका लढवित आहेत.
वेल्हे तालुका आजही विकासापासून दूरच'
By admin | Updated: February 13, 2017 01:24 IST