लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेत १५ वर्षे सत्तेवर असताना अंदाजपत्रक करताना आम्ही कधीही सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव केल नाही; परंतु सध्या महापालिकेत सुरू असलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली.अजित पवार मंगळवारी पक्षाच्या बैठकीसाठी पुण्यात आले होते. या वेळी महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या तरतुदींमध्ये दुजाभाव झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे नगरसेवक अॅड. भैयासाहेब जाधव, महेंद्र पठारे आणि योगेश ससाणे यांनी पवार यांची भेट घेतली. या वेळी अंदाजपत्रकाबाबत करण्यात आलेल्या याचिकेबाबत पवार यांना माहिती देण्यात आली. याबाबत पवार यांनी सांगितले, की स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवकांनी दाखल केलेली याचिका मागे घेण्याची विनंती केली; परंतु त्यानंतर मोहोळ यांनी आपल्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. त्यांनी चर्चा केल्यास पुढील निर्णय घेऊ, असे पवार यांनी स्पष्ट केले.स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ५ हजार ९१२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. या अंदाजपत्रकाला मुख्य सभेने एकमताने मान्यता दिली; परंतु त्यामध्ये सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधी नगरसेवकांना असमान निधीवाटप करण्यात आले आहे. शहराचा समान विकास होणे आवश्यक असताना अशा प्रकारे निधीवाटप चुकीचे असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीच्या या तीन नगरसेवकांनी ही याचिका दाखल केली आहे.
आम्ही कधी भेदभाव केला नाही
By admin | Updated: May 24, 2017 04:33 IST