लोकमत न्यूज नेटवर्क
जुन्नर : ‘‘सर्वांच्या मनात शिवरायांचे अखंड स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. छत्रपती दैवत का आहे तर रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी व त्यासाठी लढण्यासाठी तलवार हाती घेण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढताना ही प्रेरणा व जिद्द आम्हा राज्यकर्त्यांना मिळते,’’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.
किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवजन्मस्थळाच्या इमारतीत पारंपरिक पद्धतीने पाळणा हालवून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संभाजीराजे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार अमोल कोल्हे, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, आमदार अतुल बेनके, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे कार्यवाह रवींद्र काजळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, तहसीलदार हनुमंत कोळेकर, नायब तहसीलदार सचिन मुंडे आदी प्रमुख मान्यवरांच्या शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला.
शिवजन्मस्थळापासून शिवकुंजस्मारकपर्यंत बालशिवबाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. शिवकुंज स्मारकातील बालशिवबाच्या शिल्पास उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मान्यवरांनी अभिवादन केले. यानंतर शिवनेरी विकास मंडळ व मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेस संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्र व इतर राज्ये यात फरक आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. शिवनेरी आपले वैभव आहे. शिवरायांचा वैभवाचा वारसा जतन करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य जनतेचे कैवारी होते. रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी राज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची जयंती आहे. कोरोना नियमांचे पालन करत शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊ द्या.
खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्रची राजधानी मुंबई व महाराजांची राजधानी रायगड जलमार्गाने जोडल्यास सागरी किल्ल्याचे संवर्धन व पर्यटनाला चालना मिळेल. त्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत.
मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष विजय घोगरे, जिल्हाध्यक्ष दिगंबर डुबल, तालुकाध्यक्ष रूपेश जगताप, माजी अध्यक्ष राजेंद्र बुट्टे पाटील, सुनील ढोबळे, जुन्नर शहर अध्यक्ष मंदार बुट्टे आदी मान्यवर यावेळी उपस्थितीत होते. शिवजयंती उत्सवानिमित्त किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळाच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार प्रशासकीय आधिकारी संकेत भोंडवे यांना, तर तालुकास्तरीय ‘शिवनेरी भूषण’ पुरस्कार सर्पदंश उपचारतज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आला.
चौकट
शिवनेरी परिसरातील विकासकामांसाठी शासनाने मोठा निधी उपलब्ध केलेला आहे. शिवनेरीचे पावित्र्य, महत्त्व लक्षात घेता विकासकामे दर्जेदार करावीत. विकासकामात उन्नीस बीस खपवून घेतले जाणार नाही. या बाबत अधिकाऱ्यांना आताच सावध करतो, अशी ताकीद अजित पवार यांनी दिली.
चौकट
शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर प्रथम आढळल्याची उल्लेख असलेल्या दुर्मीळ फुल फ्रेरिया इंडिका डालझेल ऊर्फ शिवसुमन या वनस्पतीची संवर्धनसाठी भारतीय टपाल विभागाने काढलेल्या विशेष लिफाफ्याचे प्रकाशन मुख्यमंत्री व मान्यवरांचे पुणे विभागाचे पोस्ट मास्टर जनरल एस. एफ. एच. रिजवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीच्या मुख्य शासकीय सोहळ्यासाठी शिवप्रेमी नागरिकांना शिवनेरीवर प्रवेशासाठी निर्बंध घालण्यात आले होते. मुख्य कार्यक्रमासाठी प्रवेशपत्राशिवाय कोणालाही शिवनेरी गडावर प्रवेश मिळाला नाही.
चौकट
थेट प्रक्षेपण झालेच नाही
राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमीना शिवजयंती सोहळा पाहता यावा म्हणून कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची सुविधा गडाच्या पायथ्याशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु त्याची कोणतीही व्यवस्था केली गेली नाही. शासकीय सोहळा समाप्त झाल्यानंतर मात्र राज्यभरातून येणाऱ्या शिवप्रेमींना गडावर प्रवेश देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवनेरी किल्ल्यावरील मुख्य शासकीय कार्यक्रमाला १०० जण उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. परंतु प्रत्यक्षात जवळपास ५०० जणांची उपस्थिती होती.
- किल्ले शिवनेरीवर शिवजन्म स्थळ इमारतीत पारंपरिक पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते पाळणा हलवून शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला.- शिवकुंज स्मारकात बालशिवबा व राजमाता जिजाऊ यांच्या शिल्पाला अभिवादन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, आमदार अतुल बेनके.
- शिवजन्मस्थळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पास अभिवादन करताना अभिवादन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार
- तेजूर ठाकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी वघगाळदरे येथील जय हनुमान लेझीम मंडळाने दाखवलेल्या गोफ नृत्याच्या प्रात्यक्षिकाचे उपस्थितांची शिवप्रेमींची मने जिंकली.
- शिवजन्मस्थळास करण्यात आलेली फुलांची सजावट व पोलीस प्रशासनाने दिलेली मानवंदना.