पुणे : शहरामध्ये सध्या एक दिवसाची पाणीकपात लागू करण्याचा निर्णय पंधरा दिवसांपूर्वीच प्रशासनाकडून घेण्यात आला आहे, ती पालकमंत्री गिरीश बापट यांनी १५ दिवस पुढे ढकलली. त्यानंतर महापौर दत्तात्रय धनकवडे खासगी कामासाठी परदेश दौऱ्यावर गेल्याने आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांची प्रतीक्षा करण्यामुळे पाणीकपात लागू करण्यासाठी आणखी ४ दिवस उशीर केला आहे. गुरुवारी पाणीकपात लागू करण्यासाठी पक्षनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती; मात्र महापौरांनी विनंती केल्याने एक दिवस पाणीकपातीचा निर्णय पुन्हा पुढे ढकलण्यात आला आहे.पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता पाणीकपातीची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये रात्री अचानक बदल करून गुरुवारची बैठक शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे. महापौर शुक्रवारी परदेश दौऱ्यावरून परत येत आहेत, त्यामुळे त्यांच्या विनंतीवरून ही बैठक एक दिवस पुढे ढकलली आहे. महापौरांच्या प्रतीक्षेसाठी पाणीकपात वारंवार पुढे ढकलली जात असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने पाणीकपात लागू करण्याचे संपूर्ण नियोजन केले आहे, सर्व राजकीय पक्षांचे गटनेते, पदाधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांनी पाणीकपात लागू करण्यास मान्यता दिलेली आहे. तरीही प्रशासनाकडून उशीर केला जात आहे. पाणीकपात लागू करण्याचा निर्णय तांत्रिक असल्याने लोकप्रतिनिधींच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याची वाट न पाहता तातडीने पाणीकपात लागू करावी, असे पत्र उपमहापौर आबा बागूल यांनी कुणाल कुमार यांना दिले होते. मात्र तरीही त्यांनी त्यावर निर्णय घेतला नाही. सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस पडेल असे गृहीत धरून पाणीकपात लागू करण्यास उशीर केला जात होता, मात्र सप्टेंबर महिन्यातही पावसाची चिन्हे दिसत नसल्याने अत्यंत अवघड परिस्थितीचा सामना पुणेकरांना करावा लागण्याची शक्यता आहे.
पाणीकपातीची घोषणा पुन्हा पुढे ढकलली
By admin | Updated: September 4, 2015 02:20 IST