पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणीसाठा अवघ्या आठवड्याभरात ५ टीएमसीवर पोहोचला आहे. तसेच, या धरणांच्या पाणलोट अजूनही पाऊस सुरू असल्याने शहरात सुरू असलेली ३५ टक्के पाणीकपात मागे घेण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्यानुसार, ही कपात पुन्हा १२ टक्क्यांवर आणून शहरात दररोज एक वेळ पाणी देण्याचा प्रशासनाचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, याबाबतचा निर्णय सोमवारी होण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील वरसगाव, टेमघर, पानशेत या धरणांच्या पाणीसाठ्याने तळ गाठला होता. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर या चारही धरणांमध्ये केवळ दीड टीएमसी पाणी उरले होते. त्यामुळे २८ जून पासून शहरात एक वेळ पाणी देण्यात येत होते. मात्र, त्यानंतरही पाऊस न झाल्याने ११ जुलैपासून शहरात दिवसाआड पाणी देण्यात येत होते. या वेळी या धरणांमध्ये सुमारे १़०७ टीएमसी पाणीसाठा होता. मात्र, १२ जुलैपासून या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
पाणीकपातीतून दिलासा?
By admin | Updated: July 21, 2014 03:51 IST