आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गाव व परिसर पूर्णपणे डिंभे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गावापासून घोडनदी तसेच मीनानदी या दोन नद्या लांबवर असल्याने शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना पूर्णपणे डिंभे धरणाच्या डावा कालवा घोड कालव्यावरील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. यावर्षी दमदार पाऊस पडला होता.त्यामुळे सुरुवातीला पाण्याची टंचाई फारशी जाणवली नाही. मात्र आता पाणीसाठे संपत चालले आहेत. विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली आहे.परिणामी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते.रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ,कांदा, बटाटा तसेच जनावरांचा चारा इत्यादी पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांना या पिकांना पाणी भरता येत नसल्याने पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.या पिकांना तातडीने पाणी भरणे गरजेचे आहे. डाव्या कालव्याच्या घोड कालव्याला पाणी आल्यानंतरच पिकांना पाणी द्यावे लागणार आहे. थोरांदळे गावातील वाडीवस्तीवर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. भविष्यात ही टंचाई वाढणार असून शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने घोड कालव्याला पाणी सोडण्याची मागणी माजी उपसरपंच मंगेश टेमगिरे व ग्रामस्थांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्यात पाण्याची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:15 IST