वाल्हे : वारी हो वारी ! देई कांगा मल्हारी !! त्रिपुरा हरी ! तुझे वारीचा मी भिकारी !! या ओवीप्रमाणे देवाला वारीचा मोह आवरला नाही. वारकऱ्यांबरोबर देवांनीही वारी केली आहे. मात्र, दोन वर्षे झाले कोरोनामुळे वारी रद्द झाली. तरीही शासन नियमांचे पालन करीत भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहात सोमवारी बसमध्ये पंढरीला निघालेल्या माऊलींचे स्वागत केले.
रांगोळ्याच्या पायघड्या, फुलांची आकर्षक तोरणे, माऊलीनामाचा अखंड गजर, आकाशातून पुष्पांचा वर्षाव....अशा उत्साही वातावरणात, पुंडलिक वरदे, हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम' च्या जयघोषात आषाढी एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका सजविलेल्या शिवशाही बसमधून आळंदीतून पंढरपूरकडे सकाळी मार्गस्थ झाल्या. सकाळी ११.३० दरम्यान जेजुरीहून आद्यरामायणकार महर्षी
वाल्मीकनगरीमध्ये आगमन होताच वाल्मीकी नगरीतील ग्रामस्थांनी ‘ज्ञानोबा माऊली, तुकाराम व महर्षी वाल्मीकींचा जयघोष करीत शारीरिक अंतराचे पालन करीत महामार्गाच्या कडेला उभे राहून वाल्हेकरांनी फुलांच्या पायघड्या अंथरून पुष्पवृष्टी करत विठूनामाच्या जयघोषात मोठ्या जल्लोषात माऊलींच्या पादुकांचे स्वागत केले. या वेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सरपंच अमोल खवले, माजी उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, उद्योजक सुनील पवार, राहुल यादव, गोरख कदम, हभप माणिक महाराज पवार, ग्रामविकास अधिकारी बबनराव चखाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदेश पवार, अनिल भुजबळ, शंकर भुजबळ, हनुमंत पवार आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. त्याचबरोबर जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी संजय महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केशव जगताप, संतोष मदने, समीर हिरगुडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
फोटो