विशाल दरगुडे
चंदननगर : वडगावशेरी-कल्याणीनगर प्रभाग क्र.५ मधील राजे शिवाजी महाराज उद्यानाजवळ असलेले पंडित दीनदयाल उपाध्याय क्रीडांगण नक्की खेळाडूंसाठी की दारूड्यांसाठी असा प्रश्न पडला आहे. सध्या या क्रीडांगणाचा वापर खेळाडू नाही तर दारूडे मद्यपानासाठी दररोज करत आहेत. या मद्यपान करणाऱ्यांकडून क्रीडांगणची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून क्रीडांगणचे नुकसान केले आहे.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक यांच्या प्रभागात हा धक्कादायक प्रकार सुरू असूनदेखील या भागाचे नगरसेवक, पोलीस आणि महापालिकाही दुर्लक्ष करत असल्याने क्रीडांगणाला ‘ओपन बार’ नाव द्यावे लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
क्रीडांगणाच्या सीमा भितींवर स्वच्छ भारत अभियानाचे रंग देऊन जनजागृती केली आहे तर भिंतीच्या अतिल बाजूस सर्व कचऱ्यासह घंटा गाड्या पडल्याने स्वच्छ भारत अभियानाचेही तीनतेरा वाजले आहेत.
क्रीडांगणाचे बांधकाम करताना प्रशासनाने, नगरसेवकांनी लक्ष न दिल्याने ठेकेदाराने बांधकाम निकृष्ट दर्जाचे व बांधकामात सिंमेटचा वापर न केल्याने वीट बांधकाम फरशी (टाइल्स) उखडली आहे. मार्बलचीही तोडफोड केली आहे. क्रीडांगणाचे मैदानही उखडले आहे. खेळाडूंसाठी बास्केट बॉलचे स्टँडही जमिनीवर कोसळले आहे. तसेच हरीनगर ते छत्रपती शिवाजी उद्यानादरम्यान रस्त्यावर उभा राहणाऱ्या पथारी व्यावसायिकांसाठी मोफत हातगाड्या लावण्यासाठी क्रीडांगणाचा वापर केला जात आहे.
माहिती फलकावरून क्रीडांगणाचे क्षेत्रफळच गायब?
या उद्यानामध्ये महापालिकेच्यावतीने क्रीडांगणाच्या क्षेत्रफळाचा फलक लावला आहे. त्यावर पुणे पेठ स.नं. ९/२, १०/१, ९/३ १०/२ प्लाॅट नं. ०३, १०/३, १०/५ वडगावशेरीमधील ऑमिनिटी स्पेस ४ चे क्षेत्र ही मिळकत पुणे मनपाच्या मालकीची आहे, असा उल्लेख आहे. मात्र, हे क्रीडांगण किती क्षेत्रांमध्ये आहे याचा उल्लेख न केल्यामुळे महापालिकेच्या कामावर संशय व्यक्त होत आहे. कारण यावर सर्व पत्त्याचा उल्लेख केला आहे. मात्र, हे क्रीडांगण किती क्षेत्र फळांमध्ये आहे. त्याचा उल्लेख माहिती फलकावरून गायब केलेला आहे.
जनतेच्या पैशांची उधळपट्टी
नागरिकांच्या कररूपात येणाऱ्या पैशांत क्रीडांगणे उभारली जातात. मात्र, ती केवळ ठेकेदारांना मोठे करण्यासाठी जनतेच्या पैशांची अशा प्रकारे नासधूस करून उधळपट्टी केली जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
क्रीडांगणचे झालेले नुकसान कोण देणार?
पंडित दीनदयाल उपाध्यय क्रीडांगणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून क्रीडांगणाचे नुकसान करणारे व ठेकेदाराने केलेले निकृष्ट दर्जाचे कामामुळे झालेले नुकसान कोण भरूण देणार आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
फोटो ओळ : वडगावशेरीतील पंडित दीनदयाल उपाध्याय क्रीडांगणाची झालेली दायनीय अवस्था व दारूच्या बाटल्या, बास्केट बॉल स्टँडची दारूड्यांनी तोडफोड केली आहे.